पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २- तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच देवळी गावात दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. सकाळी ७ वा. सुमारास एका घराच्या पत्राशेडची पुढील सौरक्षण भिंत कोसळली आणि ती थेट खालील बाजूस असलेल्या शैलेश सुरेश भोजने यांच्या घराच्या किचनवर कोसळली.

या घटनेमुळे किचनमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून घरालाही मोठी हानी पोहोचली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. घटना घडल्यानंतर काही क्षणातच देवळी गावचे सरपंच विनेश डवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पीडित कुटुंबाशी संवाद साधला, धीर दिला तसेच शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, सततच्या पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


































