पोलीस प्रवाह न्यूज
दि. ५, रायगड– सध्या माणगांव उतेखोलगांव येथील नगर पंचायत जलशुद्धीकरण केंद्रातील रिनिव्हेशन (नुतनीकरण) केलेला जुना फिल्टर प्लाण्ट दूरुस्ती व डागडूजी नंतर आकर्षक रंगरंगोटी करुन सजविण्यात येत आहे. येथील भिंती वर आपल्या कलेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील एक अवलिया कलाकार आपला कलाविष्कार साकारत आहे. त्यामुळे हा उतेखोल येथील जलशुद्धीकरण परिसर आणि येथील जूनाच फिल्टरेशन प्लाण्ट रिनिव्हेशन नंतर नव्या रुपात माणगांवकरांना आता पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे डिजीटल एआयच्या आधुनिक जमान्यात जातीवंत चित्रकारांची कलाकारी मागे पडत चालली, सर्वत्र डिजीटल चित्र, बॅनरचा वापर होत असल्याने हे कलाकारच दिसेनासे झाले. अशा विपरित परिस्थितीत ग्रामीण भागातील पंचशील नगर विळे येथील ‘सुधीर सावळाराम ओव्हाळ’ एक जातीवंत चित्रकार कोणतेही प्रशिक्षण अथवा कोर्स न करता केवळ आपल्या अंगभूत कलागुणांचा वारसा जोपासताना म्हणतो, कलेला मरण नाही आधुनिक जमान्यातही चित्रकारांस करण्यासारखे काम खूप आहे, तासनतास मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर जातीवंत कलाकार प्रतिकूल परिस्थितीतही अस्तित्व टिकवून आहेत, असे त्याने म्हटले आहे.

सुधीर ओव्हाळने आपल्या चित्रकलेच्या बळावर अनेक साईन बोर्ड पेंटींग, पोर्ट्रेट पेंटींग, सर्व प्रकारची भित्तीचित्र आजवर लिलया साकारली आहेत. सूधीर याने मानस हाॅटेल लिटिल व्ह्युव वाटर पार्कचे कलात्मक रंगकाम, अनेक मंदिराच्या भिंतीवर पौराणिक कलाविष्कार, शैक्षणिक शाळांवरील उद्बोधक भित्तीचित्र विद्यार्थ्यांशी बोलणाऱ्या या भिंती साकारल्यात, दापोली येथील रिसॉर्टचे आपल्या अविष्काराने रुपडे पालटले आहे. आपल्या कलाकारीने कर्नाटक चित्रालयाची प्रोफेशनल आर्टीस्टची मेंबरशिप त्याने मिळवली आहे. नुकतेच बेंगलोर येथील एका चित्र प्रदर्शनात त्याची दहा कॅनव्हास पेंटींग चांगल्या किंमतीत विकली गेली, लेखक उमेश दोशी (होमिओपॅथ) लिखीत “गोष्टी अंतर्मनातील” या पुस्तकाचे बोलके मुखपृष्ठ देखील त्याने तयार केले, शासनाचे स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, योजनांची जनजागृतीपर चित्र व विशेष मुंबईत कोरोना काळात जनजागृतीपर पोस्टर सूधीरने चितारल्याचे सांगितले.
विळे गावच्या या कलाकाराने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जेमतेम इयत्ता ९ वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. कुटुंबाला हातभार लावण्यास कलेच्या माध्यमातून तो चार पैसे कमावित प्रपंच चालवितो. डिजीटल जमान्यात पेंटींग, पोर्ट्रेट पेटींगचा वारसा जतन करणाऱ्या सुधीरने आपल्या सोबतच थरमरी आदिवासी वाडीतील तरुण सचिन नामदेव जाधव याला देखील हाताखाली संधी देवून कलाकार घडवित आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या गिताबाग येथील वाॅटर फाॅलची लाईव्ह कलाकृती सन २०२० साली त्यानेच बनविली त्यावेळेस तटकरे कुटुंबियांनी शाबासकी दिल्याची माहिती त्याने दिली.




































