पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २४- तालुक्यातील निजामपूर विभागात सध्या आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पूर्वतयारीला जोरदार वेग आला आहे. त्यामध्ये अनेक गाव वाड्या वस्त्या यांचे पक्ष बदलासह पक्ष प्रवेश होत आहेत. तर काहींचे पक्षप्रवेश आणि पक्षबदल होणार अशा चर्चा नाक्यानाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहेत. या चर्चांमध्ये निजामपूर विभाग यामध्ये अग्रेसर ठरला आहे. यामध्ये निजामपूर विभागातील भाले ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताराम खांबे व शिरवली ग्रामपंचायत सरपंच सदानंद पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा निजामपूर विभागात सुरू होत्या. मात्र या दोन्ही सरपंचांनी दि. २४ डिसेंबर रोजी निजामपूर येथे पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
या पत्रकार परिषदेत भाले सरपंच दत्ताराम खांबे व शिरवली सरपंच सदानंद पानसरे म्हणाले की, आम्ही खासदार सुनिल तटकरे, ना. आदिती तटकरे तसेच मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा महाड विधानसभा क्षेत्र मा. अध्यक्ष चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ठाम आहोत. विरोधकांना आता काही मुद्दे उरले नसल्याने आमच्या पक्षप्रवेशाच्या अफवा पसरविल्या जात आहेत. आम्ही कालही राष्ट्रवादीमध्ये होतो आणि आजही राष्ट्रवादी मध्ये आहोत. उद्या देखील राष्ट्रवादी मध्येच राहणार आहोत, असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
या पत्रकार परिषदेला भाले सरपंच दत्ताराम खांबे, शिरवली सरपंच सदानंद पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस मा. विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर, मा. उपसभापती तुकाराम सुतार, भाले उपसरपंच प्रकाश शेपुंडे, मा. ग्रामपंचायत सदस्य सुभाष राणे, जेष्ठ नेते जनार्दन शिळीमकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते संजोग मानकर निजामपूर विभागातील राष्ट्रवादी जेष्ठ व युवा पदाधिकारी उपस्थित होते.


































