पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १९- महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित गेली १७ वर्षे वनवास भोगणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासह खा. सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दि. १८ मे रोजी लोणेरे येथे पाहणी केली. मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात प्रकल्पातील अडचणींचा आढावा ना. अजित पवार यांनी घेतला. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. त्यानंतर हॉटेल आनंद भुवन येथे अधिकारी वर्ग, कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला महामार्ग अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. या बैठकीत पनवेलपासून ते महाड पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचा आढावा घेण्यात आला. माणगाव व इंदापूर येथील वाहतूक कोंडी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. यावेळी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी सारवासारवीची उत्तरे देत पुन्हा एकदा महामार्गाचे काम लांबणीवर जाईल असे सांगितले.
पर्यायी मार्ग उपलब्ध करा ना. पवारांचे आदेश
सध्या माणगावातील बायपास तातडीने पूर्ण होणार नाही हे खरे आहे. परंतु, इंदापूर ते कशेणे कालवा रोड पर्यायी मार्ग तसेच माणगाव शहरातील मोर्बा रोड, कालवा मार्ग ते मुंबई गोवा महामार्ग असा पर्यारी मार्ग उपलब्ध करा येऊ शकतो. तसेच साईनगर कालवा मार्ग, भादाव ते विंचवली हा मार्ग झाल्यास कायमस्वरूपी वाहतूक कोंडीतून सुटका होईल. माणगाव शहरातील नगरपंचायत हद्दीत उपकालवा जातो. या कालव्यालगत पाटबंधारे विभागाची जागा आहे. त्या जागेतून रस्ता बनविल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. या पर्यायी मार्गांसाठी केंद्र सरकारने मदत न केल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या असे आदेश ना. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बायपासला मुहूर्त कधी मिळणार?
माणगाव आणि इंदापूर बायपास अकडल्याने गेली पाच वर्षे माणगावला भयंकर त्रास होत आहे. तसेच या महामार्गावर अनेक निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. इंदापूर माणगाव बायपासचे टेंडर निघाले आहे. परंतु, लोणेरे येथील महामार्ग चे काम पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करणाऱ्या नवीन कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिली. त्यामुळे माणगाव, इंदापूर बायपासला मुहूर्त कधी मिळणार? इंदापूर, माणगाव बायपास पूर्ण करण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती यावेळी कंत्राटदाराने दिली. परंतु अद्याप पर्यंत नवीन ठेकेदाराला वर्क ऑर्डरच मिळाली नाही. त्यामुळे इंदापूर, माणगाव बायपासचे काम कधी सुरू होईल. व नागरिकांना वाहतूक कोंडीतून कधी सुटका मिळेल?

नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे
मुंबई गोवा महामार्ग लगत अनेक छोटी मोठी गावे आहेत. तेथील नागरिक महामार्गावरून प्रवास करीत असतात. त्या नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. जिथे गरज वाटेल तिथे सर्विस रोड बनविले पाहिजेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
सर्विस रोड बनवत असताना तेथे पाणी साचणार नाही यासाठी बाजूला गटारी सुद्धा बांधली गेली पाहिजे. सर्विस रोड वरून नागरिकांची मोठी वाहने सुद्धा या बाजूकडून त्या बाजूकडे सहजरीत्या गेली पाहिजेत यासाठी योग्य ती उंची राखूनच काम केले गेले पाहिजे. नागरिकांचे हित बघूनच अधिकाऱ्याने काम केले पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्यात ढालघर फाटा येथे पाहणी करणार असल्याचे होते. रवाळजे, निजामपूर, गांगवली मार्गे ते ढालगर फाटा येथे पाहणी करून समस्या जाणून घेणार होते. परंतु, मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ते हेलिकॉप्टर द्वारे लोणेरे येथे आले व त्यांनी लोणेरे येथे महामार्गाची पाहणी केली. यावर खासदार सुनील तटकरे यांनी असे सांगितले की, जर उपमुख्यमंत्री पवार यांनी महामार्गाने प्रवास केला असता तर पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली असती. त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला असता. त्यामुळे नियोजित दौऱ्यात बदल करून पाहणे दौरा करण्यात आला.
पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी
नामदार अजित पवार यांच्या बैठकीत रायगड पोलीस अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात यावे. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. असे आदेश यावेळी नामदार पवार यांनी दिले


































