पोलीस प्रवाह न्युज
तळा, दि. १५- मुंबईसह संपूर्ण कोकणातील सर्व तहसील कार्यालयासमोर सोमवारी भर पावसात कुणबी समाजाने आक्रोश निदर्शने केली. ‘ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन’ अंतर्गत तालुका तळा येथे दि. १५ सप्सटेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनात मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला व युवक सहभागी झाले.
मोर्चाची सुरुवात श्री चंडीका देवी मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला असता स्थानिक पोलिसांनी घोषणाबाजी बंद करण्याची सूचना केली. मात्र समाजबांधवांनी “रद्द करा हैद्राबाद गॅझेटियर जीआर”, “घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा”, “जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे”, “अन्यायाने भोगली सजा, जागा झाला कुणबी राजा” अशा घोषणांसह आपला आक्रोश व्यक्त केला.
तळ्याच्या बाजारपेठेतून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर सभेत परिवर्तित झाला. या सभेत नेत्यांनी शासनाने काढलेला हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली. मराठा-कुणबी एकच असल्याचे सांगत सरकारने काढलेला जीआर कुणबी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर अन्यायकारक ठरतो, असे वक्तव्य करण्यात आले. यामुळे मूळ ओबीसीतील कुणबी समाज आक्रमक झाला असून राज्यभर तीव्र आंदोलन पेटले आहे. मुंबईत या जीआरची होळी करण्यात आली असून कोकणातील सर्व तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
तळा येथील सभेतून १२ जणांच्या शिष्टमंडळाने माननीय तहसिलदार सौ.स्वाती पाटील यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन सादर केले. या निवेदनात ओबीसी आरक्षणाचे रक्षण व्हावे, मराठा समाजाची कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबवावी तसेच जातनिहाय जनगणना करावी, अशा ठळक मागण्या करण्यात आल्या.
या निदर्शनात मुंबई शाखेतून शाखाध्यक्ष यशवंत शिंदे, सरचिटणीस सुनील जाईलकर, माजी सहसचिव अशोक करंजे, कार्यकारणी सदस्य जनार्दन शिगवण, उपाध्यक्ष दिनेश रामाणे, माजी उपाध्यक्ष महादेव कुभेकर, सहसचिव लक्ष्मण अडखळले, सदस्य विश्वनाथ पवार, युवक मंडळ सचिव देवीदास बांद्रे, वैद्यकीय विभाग प्रमुख नितीन चाळके, अर्जुन दुर्गुले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण शाखेतून शाखाध्यक्ष नामदेव काप, खजिनदार भानू मंचेकर, समाजनेते रविशेठ मांडवकर, ओबीसी अध्यक्ष सचिन कदम, संघ प्रतिनिधी यशवंत मोंडे गुरुजी, कमलाकर चोरगे गुरुजी, माजी अध्यक्ष कृष्णा भोसले, नरेंद्र लोखंडे, जनार्दन पांढरे, पांडुरंग कळंबे, तुकाराम पाटेकर, राम सावंत, युवक सचिव स्वप्नील वरंडे, सुनील बैकर, संदीप मोडक, कांतीलाल कजबले आदींसह मोठ्या संख्येने गावोगावचे ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
या निदर्शनामुळे तालुका तळा तहसील कचेरी परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर राज्यभर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा समाजबांधवांनी दिला.