पोलीस प्रवाह न्युज
माणगाव- दि. २८- जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पितळ उघडे पडले आहे. ठिकठिकाणच्या सर्व्हिस रोडची पार दुरवस्था झाली आहे. सर्व्हीस रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
माणगावजवळ लोणेरे येथे उड्डाण पूलाचे काम सुरू आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हीस रोडवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. अंदाज घेत वाहन चालवावे लागते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने खडी टाकून रस्ते बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. टेमपाले गावाजवळील उड्डाण पूलाला लागून असलेल सर्व्हीस रोडवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयांत पाणी साचून त्याची डबकी झाली आहेत. दुसरीकडे कोलाड नाक्यावरील उड्डाण पूलालगत तीच अवस्था पहायला मिळते. खडीचा लांबच लांब पट्टा कोलाड बाजारपेठेत लगत अंथरण्यात आला आहे. मोठया पावसात ही खडी खड्डयांतून बाहेर पडून परिस्थिती जैसे थे होत आहे.
नागोठणे, आमटेम येथील उड्डाण पुलाजवळ सर्व्हिस रोडला खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो आहे. तेथील खड्डयात खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी सुरू असल्याचे पहायला मिळते.
गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी सरकारकडून अनेकदा डेडलाईन देण्यात आल्या. परंतु, आजही हे काम अपूर्णावस्थेतच आहे. मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत चांगलीच कान उघाडणी केली होती.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र जून महिना सुरू व्हायला काही दिवस राहिले असताना महामार्गाचे काम पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीत. महामार्गावरील पुलांची आणि बाह्य वळण रस्त्यांची कामे रखडली असल्याने सुखकर प्रवासासाठी कोकण वासियांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्य वळण रस्त्यांची कामे सध्या ठप्प आहेत. नवीन कंत्राटदार नेमून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाह्यवळण रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




































