पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १८ – एस. टी. बसमधून प्रवास करित असलेल्या एका महिलेचे दागिने चोरीस गेल्याची घटना महिनाभरपूर्वी घडली होती. गोरेगांव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि पूर्वेतिहास तपासून या चोरीचा तपास करत महिलेला अटक करुन तिच्याकडून २ लाख १२ हजार ५०० रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी कौतुक केले आहे.
फिर्यादी रविना अनिकेत पोळेकर (रा. तासगांव, ता. माणगांव. सध्या रा. विक्रोळी मुंबई) या दि. १६ मे रोजी लोणेरे येथून गोरेगांव-मुंबई या एस.टी.बसने मुंबई येथे जात असताना लोणेरे ते माणगांवदरम्यान त्यांच्या पर्समधील ३६.१०० ग्रॅम वजनाचे १७५००० रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, दहा हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, ५१ हजार रुपये किंमतीची सेान्याची चेन, २२५०० रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले आणि ५ हजार रुपये किंमतीची सोन्याची नथ असा एकूण २६३५०० रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत पोळेकर यांनी गोरेगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गोरेगांव पोलिसांनी दि. २१ मे रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
लोणेरे येथील सीसीटीव्हीचे फुटेजच्या आधारे गोरेगांव पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता फिर्यादी महिला गाडीत चढत असताना एका महिलेची हालचाल त्यांना संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या महिलेच्या फोटोवरुन माणगांव, महाड या पोलीस ठाण्यातील अभिलेखाची पडताळणी केली असता या महिलेचे नाव शोभा उर्फ मंगल अंकुश साठे उर्फ लता पोपट कांबळे (वय ५४, रा. भाटघर, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी माहिती प्राप्त झाली. या माहितीवरुन गोरेगांव पोलिसांनी दि. १५ जून रोजी सातारा येथे या महिलेला अटक करत तिच्याकडून २ लाख १२ हजार ५०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
अटक करण्यात आलेल्या शोभा साठे या महिलेच्या विरोधात यापूर्वी गोरेगांव पोलीस ठाण्यात एक, महाड शहर पोलीस ठाण्यात ३, दापोली, जि. रत्नागिरी पोलीस ठाण्यात दोन, तर लोणंद पोलीस ठाण्यात एक असे सात गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती गोरेगांव पोलिसांना प्राप्त झाली असून या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक रासकर, पोलीस हवालदार पवार, रसाळ, महिला पेालीस हवालदार खाडे, पोलीस शिपाई सय्यद, महिला पोलीस शिपाई घाग, सौ. शेलार यांनी महत्पूर्ण कामगिरी केली. पोलीस पथकाचे जिल्हा पेालीस अधीक्षक आचल दलाल यांनी कौतुक केले.