पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ७- रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल प्रोजेक्ट चेअरमन व माणगाव तालुक्यातील शिरवली (तर्फे गोवले) गावचे सुपुत्र दत्ताराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याच्या संकल्पना नुसार वृक्षारोपण करण्याची सुरुवात माणगाव शहरापासून सुरू झाली. दिनांक ७ जुलै रोजी माणगाव मधील माणगाव प्रशासकीय भवन समोर असणाऱ्या रायगड जिल्हापरिषद शाळा विकास कॉलनी येथे निसर्गोपयोगी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल ही संस्था माणगाव तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभर ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण, विशेष करून आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यासाठी शिक्षणासाठी लागणाऱ्या पायभूत सुविधा तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. माणगाव तालुक्यात रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल मागील अनेक वर्ष सामजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान बजावत कार्य करत आहे.
माणगावमधील सुमारे २० जिल्हा परिषद प्राथमिक व पूर्ण प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याच्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलचा मानस असून मागील आठवड्यात १० शाळा सोलर करण्यात आल्या व १२ शाळांना इ लर्निग किट देण्यात आले.
प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कॉलनी शाळा येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपण प्रारंभ कार्यक्रमप्रसंगी माणगाव गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबट, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, विकास कॉलनी शाळेच्या शिक्षिका निलम गायकवाड, पूर्वा येलवे, जेष्ठ पत्रकार सुनिल राजभर, परेश शिंदे, प्रमोद जाधव, राशिद कासार व विकास कॉलनी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.



































