पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- सुधारित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी नियामक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध जिल्ह्यांमधील आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाल्या. त्यांनी रायगड जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. सध्या ३० पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांनाच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याची परवानगी आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अशा क्षमतेची खाजगी रुग्णालये फारच कमी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा पुरेसा लाभ मिळत नाही, अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
त्यामुळे २० किंवा त्यापेक्षा कमी खाटांची संख्या असलेल्या रुग्णालयांनाही या योजनेत सामावून घ्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यामुळे जिल्ह्यातील लहान खाजगी रुग्णालयांमार्फत जास्तीत जास्त नागरिकांना उपचार मिळू शकतील. याशिवाय सध्या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांच्या शाखांनाही ही योजना लागू व्हावी, अशी मागणी त्यांनी मांडली. शासकीय जागा उपलब्ध करून दिलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये योजना आपोआप लागू होईल, अशी स्पष्ट व्यवस्था शासनाने करावी, अशीही सूचना अदिती तटकरे यांनी बैठकीत केली.
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत व उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत आहे. मात्र या योजनेचा लाभ रायगडसह ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा.यासाठी अदिती तटकरे यांनी उपस्थित केलेल्या मागण्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. बैठकीत या सूचनांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.