पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ८- लोणेरे विभागाच्या वतीने गोरेगाव उपविभागात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता अर्जून राठोड यांच्या आदेशानुसार स्मार्ट मीटर जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. सहाय्यक अभियंता योगेश बढीया यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कर्मचारी वर्गाने लोकांशी थेट संवाद साधून स्मार्ट मीटरचे फायदे आणि गरज याबाबत सविस्तर माहिती दिली.
या जनजागृती मोहिमेत लाईनमन केशव जांबरे तसेच वायरमन सुरेंद्र शिर्के, रुपेश नलावडे, हर्षद सालदूर, सोमेश्वर काळस्पेपे, संकेत अंधेरे, भावेश धोंडगे, वृषभ पवार, प्रसाद धाडवे, आदींनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील परिसरातील लोकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया, त्याचे फायदे, वीजबचतीतील उपयोग, पारदर्शक बिलिंग प्रणाली आणि ग्राहकांना मिळणारी सुलभ सेवा याची माहिती दिली.
लोकांना समजावून सांगताना कर्मचारी वर्गाने पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरचे फायदे अधोरेखित केले. स्मार्ट मीटरमुळे विजेचे वापराचे अचूक रेकॉर्ड मिळते, बिलिंगमध्ये पारदर्शकता राहते, तक्रारींना त्वरीत प्रतिसाद मिळतो आणि ग्राहकांना त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते, याबाबत जनतेला जागरूक केले.
या उपक्रमाला लोणेरे परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी शंका उपस्थित करून त्यांची समाधानकारक उत्तरेही मिळवली. विज विभागाच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात असे उपक्रम राबविल्यास जनतेत विश्वास व सहभाग अधिक वाढेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.


































