पुणे बस स्थानक परिसरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या महिला प्रमुख निलम संतोष म्हात्रे यांनी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनला पत्र देवून वल्लभनगर बस स्थानक आणि सुकवाणी कॅम्पस परिसरातील सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वल्लभनगर बस स्थानक हे पिंपरी-चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे, जिथे दररोज अनेक प्रवासी, विशेषतः महिला आणि विद्यार्थी, ये-जा करतात. सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी आणि संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी येथे दोन पोलिसांची नियुक्ती आवश्यक आहे, असे निलम म्हात्रे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
तसेच, सुकवाणी कॅम्पस परिसरात संध्याकाळी ५ नंतर अवैध दारू अड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे येथून जाणाऱ्या महिला आणि मुलींना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या अड्ड्यांमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, संतोष म्हात्रे यांनी पोलिस प्रशासनाला या अवैध दारू अड्ड्यांवर त्वरित कारवाई करून ते बंद करण्याची विनंती केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या मागण्यांची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांकडून होत आहे.
निलम संतोष म्हात्रे
महिला प्रमुख
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान संत तुकाराम नगर




































