पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ११- वालावलकर रुग्णालयात नुकतेच चार रुग्णांवर ” इंटरव्हेशन रेडिओलॉजीद्वारे ” उपचार करण्यात आले. इंटरव्हेशन रेडिओलॉजी म्हणजे रुग्णाला छोट्याशा सुईद्वारे रुग्णांच्या शरीरात असणाऱ्या आजारग्रस्त भागात जाऊन उपचार करणे होय. नुकतेच वालावलकर रुग्णालयात टाटा हॉस्पिटलचे इंटरव्हेशन रेडिओलॉजीस्ट डॉ. शरद चंद्रा यांनी चार रुग्णांवर उपचार केले. पहिल्या रुग्णाला हिमोडायलेसीससाठी लागणारा परमाकॅथ कॅथेटर मानेच्या शिरेत बसवला गेला. या परमाकॅथ कॅथेटरद्वारे रुग्णाला डायलेसीसचे उपचार करणे सुकर होणार आहे.
तर दुसऱ्या रुग्णाला स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे रुग्णाच्या पित्तनलिकेला अडथळा निर्माण झालेला होता. त्यामुळे रुग्णाला कावीळ झालेली होती. इंटरव्हेशन रेडिओलॉजी प्रोसिजरद्वारे रुग्णाच्या पित्तनलिकेत मेटल स्टेन्ट बसवला गेला. रुग्णांच्या यकृतात छोट्याशा सुईद्वारे पित्तनिलकते प्रवेश मिळवून लोकल भूलेखाली ही प्रोसीजर करण्यात आली. आता स्टेन्ट बसवल्यामुळे रुग्णांची कावीळ कमी होईल व त्यानंतर स्वादुपिंडाच्या कॅन्सरवरती केमोथेरपीचे उपचार सुरु करण्यात येतील.
तिसऱ्या पेशंटला पित्ताशय नलिकेचा कॅन्सर झालेला होता. या पेशंटला कावीळ झालेली होती. या रुग्णास इंटरव्हेशन रेडिओलॉजीद्वारे पी.टी.बी.डी. द्वारे मेटॅलीक स्टेन्ट बसवण्यात आला. या रुग्णाची कावीळ कमी झाली की, रुग्णाला कोलनजीऑ कार्सिनोमा कॅन्सर वरती केमोथेरपी सुरु करण्यात येईल. वरील दोन्ही कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.
तर चौथा रुग्ण हा जठराच्या कॅन्सरमुळे वालावलकर रुग्णालयात ऍडमिट झालेला होता. या रुग्णास जठराच्या पायलोरस भागात कॅन्सरची गाठ तयार झालेली होती. या रुग्णास पोटदुखी होत होती. तसेच या रुग्णाला रक्ताच्या उलट्या होत होत्या. टाटा हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणवली यांनी रुग्णांची वालावलकर रुग्णालयात तपासणी केली. रक्ताच्या उलट्या होत असल्याने डॉ. बाणावली यांनी वालावलकर रुग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आनंद जोशी यांनी इंडोस्कोपी करण्यास पाठवले. इंडोस्कोपी केल्यानंतर असे लक्षात आले की रुग्णांच्या कॅन्सरच्या गाठीतून जठरात रक्तस्त्राव होत आहे. त्यामुळे रुग्णांस रक्ताच्या उलट्या होत आहेत. रुग्णांची सी.टी. अँजियोग्राफी करून रक्तस्रावाची जागा पाहण्यात आली. या रुग्णास इंटरव्हेंशन रेडिओलॉजी द्वारे डी. एस. ए. टेस्ट करण्यात आली. रुग्णांच्या जांघेतील शीरेत सुई घातली. या सुईमधून मायक्रोकॅथेटर घालून रक्तस्त्राव होत असलेल्या रक्त वहिनी पर्यंत जाऊन तिथे रक्त वाहिनी औषधाद्वारे बंद करण्यात आली. त्यामुळे रुग्णांच्या जठरातून होत असलेला रक्तस्त्राव ताबडतोब थांबला आहे.
वालावलकर रुग्णालय हे आता कोकण विभागांतील सर्व प्रकारच्या आजारांवरती उपचार करणारे अग्रगण्य रुग्णालय म्हणून नावारूपास आलेले आहे. येथे अतिशय उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा अत्यल्प दारात किंवा मोफत केल्या जातात. वरील सर्व रुग्णांना महात्मा जोतिबा फुले, योजनेतून मोफत उपचार करण्यात आले. डॉ. श्रीपाद बाणावली सारख्या भारतातील नामवंत अशा कॅन्सर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांना उपचारांचा लाभ मिळत आहे.
इंटरव्हेशन रेडिओलॉजी प्रोसिजरच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करताना छोटयाश्या सुईद्वारे हे उपचार केले जातात. रुग्णांला संपूर्ण भूल दयावी लागत नाही. तसेच रुग्णाला शस्त्रक्रियेद्वारे करावी लागणारी चिरफाड केली जात नाही. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर आजारावरील उपचारांना प्रतिसाद देऊ लागतो. वालावलकर रुग्णालय व मुंबईचे जगप्रसिद्ध टाटा रुग्णालय संलग्न असल्यामुळे रुग्णांवरील उपचाराच्या सर्व पद्धती ह्या टाटा रुग्णालयाप्रमाणे आहेत. कोकण विभागातील जनतेने वालावलकर रुग्णालयांतील विविध आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन वालावलकर रुग्णालयांच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.