पोलिस प्रवाह न्युज
तळा – दि. ८ – तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला आहे. रहाटाड येथून तळा येथे येणारी एसटी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तृप्ती विजय खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या रुपेश गवाणे, विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालिकेचाही समावेश आहे.
या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रथमदर्शनी पाहता अपघातास डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे डंपर चालवणारा चालक वीस वर्षांखालचा असल्याचेही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे




































