पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५- रायगड जिल्हा परिषदेच्या बोरघर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीविषयक ज्ञान घेतले. हा उपक्रम गावातीलच एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा पाऊल ठरला आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दिनेश मोहे यांच्या घरासमोरील शेतात नेण्यात आले. तिथे त्यांना शेतीची प्राथमिक माहिती, मातीची ओळख, पेरणी, लावणी, खतांचे प्रकार, सिंचन पद्धती, आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजावण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक दिनेश आवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहशिक्षक ढोलेपाटील सर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून सखोल माहिती दिली.
गावातील शेतकरी दिनेश मोहे यांनी स्वतः पुढाकार घेत शेताचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले केले. विद्यार्थ्यांनीही भरभरून सहभाग नोंदवत निसर्गाशी जुळवून घेतलेली ही शिक्षणप्रक्रिया अनुभवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.




































