पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी, दि. १- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ साठी नेहरूनगर मधील सीए अरविंद भोसले यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी प्रयत्नशील असून ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवित आहे. नागरिकांचा सहभाग व जनजागृती वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२५ साठी देशाला स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या अवकारिका चित्रपटाचे दिग्दर्शक, सीए अरविंद भोसले यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भोसले यांनी विविध लघुपट, चित्रपटाद्वारे सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अनेक लघुपटांना राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार देखील मिळाले आहेत. नुकताच त्यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आणि पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश देणारा अवकारिका चित्रपट प्रदर्शित झाला होता.
शहरातील कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागामुळे स्वच्छतेबाबतचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.




































