पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५- शहरातील बामणोली रोड येथील रायगड शिक्षण संस्था संचालित भास्करदादा कामेरकर विद्यालयाचे २६ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ तसेच विविध गुणदर्शन सन २०२५-२६ हा कार्यक्रम “जल्लोष नूतन मनांचा, अविष्कार विद्यार्थी कलागुणांचा” दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज प्राचार्या डॉ. अमृता देशमुख यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला रायगड शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. संतोष कामेरकर, संचालक लखमसी पटेल, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक अजित तार्लेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात संस्थेचे सेक्रेटरी निपुण कामेरकर, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सदस्य डॉ. नूतन कामेरकर, लखमसी पटेल, चित्रा पाठारे, विश्वनाथ कामेरकर, सदानंद कुडाळकर, डॉ. सिद्धी कामेरकर, भास्करदादा कामेरकर विद्यालय माणगाव मुख्याध्यापक अविनाश पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवा व कर्मचारी वर्ग यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक असलेल्या डॉ.अमृता देशमुख यांनी रायगड शिक्षण संस्था आणि चेअरमन डॉ. संतोष कामेरकर यांच्या वैद्यकीय सेवेबरोबरीने सामजिक आणि शैक्षणिक कार्याची स्तुती करत गौरव केला. त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना आधुनिक आणि डिजिटल सोयी सुविधायुक्त शिक्षण भास्करदादा कामेरकर विद्यालयात मिळत आहे. ही खरी आनंदाची बाब आहे. शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रात कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची संधी आज मला मिळाली याबद्दल मी डॉ कामेरकर यांचे आभार मानते. तसेच महिन्यातून एकदा तरी या शाळेसाठी वेगवेगळ्या आधुनिक विषयांवर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळावी अशी मागणी देखील डॉ अमृता देशमुख यांनी केली. संस्थेचे चेअरमन डॉ. कामेरकर आपल्या मनोगतात म्हणाले की, सुमारे २५ वर्षापूर्वी माणगाव मध्ये २९ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा आज वटवृक्ष बहरताना दिसत आहे. याचे श्रेय संपूर्ण भास्करदादा कामेरकर विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी आहे. आणि शाळेच्या बाबतीत अजून सुधारणा करून शाळेच्या प्रगतीचा आलेख अजून उंच करण्याचा आम्ही प्रयत्न करू.




































