पोलीस प्रवाह न्युज
माणगांव, दि. ३- भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दि.३ जानेवारी रोजी रायगड इन्स्टिटयूट ऑफ आय.टी. माणगांव यांच्या वतीने सरलादेवी हॉल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘शासकीय योजनांची माहिती’ आणि ‘मोफत कॉम्प्युटर कोर्स प्रशिक्षण शिबिराचा’ शुभारंभ करण्यात आला, तसेच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून चारिझन फाउंडेशन अध्यक्षकॅप्टन निर्मल सिंह रंधावा, इतिहास तज्ञ व साहित्यिक रामजी कदम, माजी प्राचार्य मा. डॉ. मुरलीधर वाणी, कामेरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदाळे सर, समाजसेविका दंत मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना प्रोत्साहित केले. विशेष उपस्थिती म्हणून सेवा सहयोग फाऊंडेशनच्या अश्विनी समेल मॅडम (संयोजिका, शिवचरित्र अभिव्यक्ती व लाठीकाठी स्पर्धा) आणि श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे इब्राहिम जालगांवकर लाभले होते. संस्थेच्या संचालिका अंकीता अजय मोरे यांनी महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत कॉम्प्युटर कोर्सच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी सविस्तर माहिती देण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चारिझन फाउंडेशन अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधवा कडून लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या महिलांना ३ विशेष बक्षिसे दिली गेली



































