पोलीस प्रवाह न्युज
चिपळूण, दि. १- डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात दिनांक ३ ते ६ नोव्हेंबर कालावधीत शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतआठ विभागातून १४ आणि १९ वर्षाखालील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारा महाराष्ट्र राज्याचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार असल्यामुळे सर्वच विभागातील गुणवंत खेळाडू या स्पर्धेला आपली उपस्थिती लावणार आहेत. सदर स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या नियमानुसार खेळविली जाणार आहे. खेळाडूंसाठी निवास व भौतिक सुविधा या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलामार्फत उपलब्ध करण्यात येणार आहेत. तीन दिवस आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये विविध नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व क्रीडाप्रेमी व टेबल टेनिस रसिकांना उत्तम खेळ बघायची पर्वणी उपलब्ध होणार आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचे मनोबल वाढवावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गाळवणकर यांनी केले आहे.




































