पोलीस प्रवाह न्युज
परंडा, दि. १४- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव (बाबासाहेब ) रामाजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, डॉ. आबरार पठाण, कार्यालय अधीक्षक श्री. पवार, डॉ. आनंद मोरे, अमोल शिंदे, साईप्रसाद बनसोडे, बापू खताळ, सिक्युरिटी गार्ड हावळे व सोहेल शेख, जया नलवडे, सिंधू सांगळे, पूजा इंगळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन आणि डॉ. आनंद मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी, संघर्षमय जीवनचरित्राचा अभ्यास करून प्रत्येकाने समाजाभिमुख व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून, ते संपूर्ण समाजासाठी प्रेरणा देणारे आदर्श उदाहरण आहे.
तसेच, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड यांच्याशी संबंधित वर्ल्डस युनिव्हर्स ऑफ मेकर्स या संस्थेने मागील वर्षी इतिहासातील सर्वश्रेष्ठ १०० विद्वानांची यादी जाहीर केली होती. त्या यादीमध्ये तथागत गौतम बुद्ध यांना प्रथम क्रमांक, तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चौथा क्रमांक देण्यात आला आहे. या महापुरुषांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी उपयुक्त असल्यामुळे त्यांना हे सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे.
या महान भारतरत्नाची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे आत्मसात करणे आणि त्यांच्या पद्धतीने परोपकारी, त्यागी व सेवाभावी कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच खरी जयंती साजरी केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राष्ट्राची एकात्मता व अखंडता ही पंचसूत्रे दिली आहेत. या तत्त्वांनुसार स्वातंत्र्य असे असावे की त्याचे स्वैराचारात रूपांतर होऊ नये, आणि समता अशी असावी की समाजातील दुर्बल व वंचित घटकांना विशेष संरक्षण व संधी मिळावी. उदाहरणार्थ, जशी एखाद्या आईला दोन मुले असतात—एक अपंग आणि एक सक्षम—तर ती आई अपंग मुलाकडे विशेष लक्ष देते, जेणेकरून तो स्वावलंबी बनून समाजप्रवाहात सहभागी होऊ शकेल. हीच खरी बंधुता आणि सामाजिक न्यायाची भावना आहे.
समान नागरी कायदा (Uniform Civil Code) या संकल्पनेचा विचार अनेक राज्यांनी स्वीकारला असून, महाराष्ट्र राज्यातही या विषयावर गंभीर चर्चा सुरू आहे. “एक देश, एक कायदा” या तत्त्वानुसार सर्व नागरिकांसाठी समान कायदा असावा, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, आरक्षण ही बाब यापेक्षा वेगळी असून, ती अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर वंचित घटकांना समाजप्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या कला, गुण व कौशल्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करण्यासाठी देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेद्वारेच समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळू शकतो, हा संविधानाचा मूलभूत हेतू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचा विचार केला असता, त्यांनी स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी परोपकारी व दिव्य कार्य केले आहे. स्वतःच्या कष्टातून व तपश्चर्येतून त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून स्वतःला सक्षम बनवले. समाजात मानवतावादी दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि समानता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी महाड सत्याग्रह आणि काळाराम मंदिर आंदोलन यांसारखे ऐतिहासिक सत्याग्रह केले. जिथे प्राणी जाऊ शकतात, तिथे माणसाला प्रवेश नाकारला जात होता, ही सामाजिक विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला.
देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून संपूर्ण राष्ट्राला एक सूत्रात बांधले. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत भारत देश हा त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या राज्यघटनेनुसार यशस्वीपणे चालत आहे.
म्हणूनच त्यांनी दिलेला महामंत्र —
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” — हा प्रत्येक नागरिकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते पितो, तो सामर्थ्यशाली बनतो आणि सुखी, संपन्न व स्वाभिमानी जीवन जगतो.




































