पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ६- माणगाव शहरात पोलीसांना वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. शिस्त, नियम आणि सुरक्षिततेबरोबरच मानवी मूल्येही जपणारे काही जण समाजात आदर्श निर्माण करतात. अशाच एका संवेदनशील प्रसंगाने माणगावातील हवालदार शिवराज बांडे यांचे मनःपूर्वक मानवतेचे दर्शन घडवले.
शनिवार दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारी साधारण २:३१ वाजता, माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गाच्या कडेला शुभारंभ मार्केटजवळील झाडाच्या सावलीखाली एक भूकेली वृद्ध आजी एकटक बसलेली दिसली. ड्युटी सांभाळताना शिवराज बांडे यांच्या नजरेत त्या आजी आल्या. त्यांनी पुढे होऊन प्रेमाने विचारले, “आजी, भूक लागली का?” त्या क्षणी आजींचे डोळे पाणावले. हळू आवाजात त्यांनी सांगितले, “भाकरी चावत नाही रे बाळा… थोडीशी भजी खाईन.” या एका वाक्याने बांडे यांच्या मनाला चटका बसला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्वतः पुढाकार घेत आजीसाठी गरमागरम भजी आणि पाण्याची बाटली आणली. त्यानंतर आजींच्या चेहर्यावरचा कृतज्ञतेचा हास्यभाव पाहून शिवराज बांडे यांनाही भावूक झाल्याशिवाय राहिले नाही. या घटनेबद्दल हवालदार शिवराज बांडे म्हणाले, “ही पोस्ट प्रसिद्धीसाठी नाही… तर भूक ही सर्वात मोठी वेदना आहे. एखाद्याला मदत करता आली, एवढीच माझी इच्छा. आजीची भूक भागली, म्हणजे माझी ड्युटीसुद्धा सार्थक झाली.”
मानवतेचा हात पुढे करणारा हा वर्दीतील सेवक आज समाजासाठी एक संदेशच देऊन गेला आहे. भुकेल्या पोटाला अन्न मिळालं, तर देवही तिथेच उतरतो. प्रसंग लहान असला तरी त्यातील करूणा, माणुसकी आणि संवेदनशीलता माणगावच्या नागरिकांना भावूक करून गेली. माणगाव वाहतूक शाखेतील हवालदार शिवराज बांडे यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वर्दीत राहूनही मनात माणुसकी जपणारा असा अधिकारी म्हणजेच समाजाचा खरा रक्षक.
पोलिस हवालदार शिवराज बांडे यांच्या मानवतेला सलाम..!


































