पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. २- “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा ,हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा”.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेजे ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार विजेते कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रास्ताविक सादर करताना महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ कांचन बुचडे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जीवनपट आणि माय मराठीची महती सादर केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे यांनी मोबाईल वापरताना व्हाट्सअप वर इंग्रजीचा आणि इमोजीचा वापर न करता मराठी भाषेचा वापर केल्यास ते संभाषण अधिक प्रभावी होऊ शकते असे मत व्यक्त केले.
मराठी भाषेचे महत्व विशद करत असताना विविध लेखक आणि कवींचे दाखले देत त्यांनी मराठीचे मोठेपण व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, कवी, लेखक राजेंद्रकुमार शेळके उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद केले आणि वाचनाचे महत्त्व पटवून दिले. द्वितीय वर्षातील गौरव बिरादार सायली काळे आणि श्रुती सपाटे या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रलेखन स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली. पत्रलेखनाचा विषय होता. “मराठी भाषेस पत्र” या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अतिशय सुंदर आणि भावनिक पत्र लिहून मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय प्रमुख कांचन बुचडे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शितल बोरस्ते यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विभाग प्रमुख प्रा. अश्विनी बनकर, प्रा. ज्योती दारकुंडे प्रा. ऐश्वर्या निचळ, प्रा. प्रगती मासाळकर ,प्रा.मीनाक्षी लोंढे ,सौ अरुणा चिगरे, श्रीमती मनीषा झाल्टे, जयंत भिसे, सागर पठारे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय प्रमुख कांचन बुचडे यांनी आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका शितल बोरस्ते यांनी केले.


































