पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १ – राजकारण म्हणजे केवळ भाषणांची स्पर्धा नाही, तर प्रशासकीय समज, अनुभव आणि जबाबदारीची जाण असणे अत्यावश्यक आहे, असे ठाम मत व्यक्त करत निजामपूर जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. राजीव साबळे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर थेट आणि सडेतोड शब्दांत टीका केली.
विळे येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत मंत्री भरत गोगावले व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲड. राजीव साबळे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी दि. १ फेब्रुवारी रोजी माणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. साबळे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
“विरोधकांना नीट बोलता येत नाही, याचा अर्थ त्यांच्याकडे प्रशासकीय व कायदेशीर ज्ञानाचा अभाव आहे. ही चालण्याची किंवा पळवण्याची स्पर्धा नसून प्रशासन समजून घेण्याची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत ॲड. साबळे म्हणाले की, मी २० वर्षे जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केले आहे. विरोधी पक्षनेते, सभापती अशी जबाबदारी सांभाळली आहे. जिल्हा परिषद अॅक्ट मी सखोल अभ्यासून आत्मसात केला आहे. त्यामुळे मला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
कोविड काळातील आजारपणाचा उल्लेख करताना त्यांनी भावनिक सूर लावला. “कोविडमध्ये मला त्रास झाला, पण याचा अर्थ मी राजकारणातून बाजूला व्हावे असा होत नाही. कोणाच्या अपंगत्वावर बोलणे ही माणुसकी नाही. आपलीही मुले-बाळे आहेत, याचे भान ठेवून बोलावे,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मंत्री गोगावले यांना लगावला.
पत्रकार परिषदेत निजामपूरचे माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे व कुंभे येथील सरपंच भागडे यांचे पती यांच्यातील कथित फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. “या क्लिपमधून नेमका पैसा कोण ओततोय, कोण घोडेबाजार करतोय, हे जनतेसमोर स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील कामगिरीवरूनही ॲड. साबळे यांनी मंत्री गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली. “२० वर्षे आमदार असताना त्यांनी एकतरी संस्था उभी केली आहे का? शिक्षण क्षेत्रात त्यांनी काय योगदान दिले? माणगाव तालुक्यात शिक्षणाची व्यवस्था आम्ही उभी केली आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांची फी माफ केली जाते, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण परतावा दिला जातो. आमच्याकडे भ्रष्टाचार सापडत नाही म्हणून प्रवेश फी वर बोलले जाते,” असा आरोप त्यांनी केला.
नर्सिंग कॉलेजला मंत्री गोगावले यांच्या आईचे नाव देण्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना ॲड. साबळे म्हणाले की, “हा प्रस्ताव माझा वैयक्तिक नव्हता, तर माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा होता. मंत्री गोगावले यांनी एकही पैशाची मदत केली नाही, परवानगीसाठीही कोणतीही हालचाल केली नाही. शेवटी खासदार खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने कॉलेजला मान्यता मिळाली. हा प्रश्न वैयक्तिक नसून संस्थेचा आहे.”
राजकीय भविष्यावर बोलताना त्यांनी भावनिक पण ठाम भूमिका मांडली. “राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना मी शब्द दिला होता की माणगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादी जिंकेल. आज दादा आपल्यात नाहीत, पण मी त्या शब्दावर आजही ठाम आहे. माणगाव तालुक्यात राष्ट्रवादीचाच विजय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे यांच्या टीकेला उत्तर देताना ॲड. साबळे म्हणाले, “गोरेगाव विभागात माझी कामे आजही बोलकी आहेत. जनतेने काम पाहून मला दोनदा निवडून दिले. मग त्यावेळी माझ्याविरोधात निवडणूक का लढवली नाही? माणगावमधील जागेच्या गैरव्यवहाराची लवकरच पोलखोल जनतेसमोर केली जाईल.”
मंत्री गोगावले यांच्या पुत्राच्या प्रकरणावरही त्यांनी गंभीर आरोप करत इशारा दिला. “अनेक दिवस फरार असलेल्या व्यक्तीवर कारवाई का झाली नाही? कलम ३०७ कसे हटवले गेले? निवडणुकीनंतर याबाबत मी याचिका दाखल करणार असून, पोलिस तपासाच्या विरोधात उपोषणही करणार आहे,” असे स्पष्ट संकेत ॲड. राजीव साबळे यांनी दिले.




































