पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- काळाच्या ओघात आयुष्याने वेगवेगळे वळण घेतले, जबाबदाऱ्या वाढल्या, संसार विस्तारला; पण मनाच्या कप्प्यात जपलेले कॉलेजचे दिवस मात्र तितकेच टवटवीत राहिले. तब्बल ४९ वर्षांनी माणगाव येथील शासकीय अध्यापिका विद्यालय, माणगाव येथील १९७५ ते १९७७ बॅच मधील विद्यार्थीनी एकत्र आल्या आणि आठवणींचा जणू दरवळलेला सागरच उसळून आला.
माणगाव येथील श्री वाकडाई मंदिर जवळील रम्य रिसॉर्टमध्ये हा स्नेहमेळावा रंगला. मंजिरी बापट आणि मंदा मेथा यांनी अथक परिश्रम घेत मैत्रिणींना एकत्र आणण्याचा ध्यास घेतला. नलिनी कजबजे आणि निला दांडेकर यांनी त्यांना सहकार्य केले. पत्ते, फोन नंबर शोधून ग्रुप तयार करण्याचे जिकिरीचे काम करुणा शेठ आणि संध्या दांडेकर यांनी हाती घेतले. तर नंदकुमार मेथा यांनीही या उपक्रमात मोलाची साथ दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हरवलेले धागे पुन्हा एकदा जुळले.
हास्य, आसवे आणि आठवणींची सरमिसळ
दिवसभर वातावरणात केवळ आनंदाची उधळण होती. विविध खेळ, गप्पागोष्टी, एकत्र फोटोसेशन, सुग्रास स्नेभोजन, मनसोक्त पोहून सर्वांनी जणू पुन्हा एकदा तरुणाई अनुभवली. व्हॅलेंटाईन डे निमित्त एकमेकींना गुलाबपुष्प देत मैत्रीचा सुगंध दरवळवला.
४९ वर्षांपूर्वीचे डि.एड. कॉलेज मधील क्षण आठवताना काहींच्या डोळ्यांत नकळत पाणी दाटले. “त्या वेळी आपण किती निरागस होतो ना!” असा एक स्वर उमटताच सगळ्याच जणी भावुक झाल्या. आज त्या आजी झाल्या आहेत; नातवंडांच्या खोड्या सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटत होती.
शिक्षक म्हणून घडवलेले आयुष्य.
या सर्व अध्यापिका पुढे जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत राहिल्या. विद्यार्थ्यांना घडवताना आलेले अनुभव, शाळेतील संघर्ष, पालकांशी संवाद या सगळ्या आठवणींनी स्नेहमेळावा अधिक अर्थपूर्ण केला. ज्यांनी त्यांना शिकवले त्या प्राध्यापकांच्या आठवणी सांगताना मात्र अश्रूंना बांध फुटला. “त्यांच्या संस्कारांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो,” असे म्हणताना कृतज्ञतेने डोळे भरून आले.
बदलत्या काळाची हळहळ
मोर्बा रोडजवळील जुन्या कॉलेजची इमारत आता पाडून त्याच ठिकाणी नवीन इमारत उभी राहिली आहे. ही बाब समजताच सर्वांच्या मनात हळहळ दाटली. त्या जुन्या वर्गखोल्या, लाकडी बाकं, घंटानाद सगळं काही डोळ्यासमोर तरळत राहिलं. “आपल्या आठवणींचं घर आता बदललं,” या भावनेने वातावरण क्षणभर स्तब्ध झाले.
निरोपाचा क्षण… मन भरून आले.
वेळ कसा सरला कळलंच नाही. अजून थोडा वेळ मिळावा, असे प्रत्येकाला वाटत होते. शेवटी एकमेकींच्या गळाभेटीत डोळे पाणावले. “आता दरवर्षी भेटूया,” हा निर्धार करून सर्वांनी जड अंतःकरणाने निरोप घेतला. डबडबलेल्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली, पण मनात पुढील भेटीची आस जपली.
तब्बल ४९ वर्षांनी झालेली ही भेट केवळ स्नेहमेळावा नव्हती; ती आयुष्याच्या प्रवासातल्या सुवर्णक्षणांची पुनर्भेट होती. मैत्री, कृतज्ञता आणि आठवणींच्या या अविस्मरणीय क्षणांनी प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी घर केले होते ते पून्हा नव्याने भेटण्यासाठी…. !




































