पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ६- तालुक्यातील पन्हळघर परिसरातील प्रसिद्ध जे. बी. सावंत हायस्कूल, पन्हळघर (लोणेरे) या शाळेतील १९९९ ते २००१ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनी गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र आले होते. शाळेच्या प्रांगणात सर्वांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींनी उजळलेला आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाची सुरुवात आजी-माजी शिक्षक, मान्यवर व उपस्थित पाहुण्यांच्या फुलांच्या वर्षावाने स्वागताने करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापक बाबूराव कांबळे आणि वरिष्ठ शिक्षकवर्गाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेचे संस्थापक स्वर्गीय जे. बी. सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थिनीच्या हस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी शंभरहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत शैक्षणिक जीवनातील सुंदर आठवणींना उजाळा देत मोलाचे मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या मनोगतात त्या काळातील किस्से, अनुभव आणि आठवणी सांगून सर्वांना भावविवश केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपले प्रेम व्यक्त करत शाळेला क्रीडासाहित्य भेट दिले. ज्यामध्ये बॅट, बॉल, स्टम्प, फुटबॉल, वॉलीबॉल यांचा समावेश होता. यानंतर सर्वांनी एकत्र केक कापून सेलिब्रेशन केले. बर्याच वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी फोटोसेशन करत जुन्या आठवणींना नव्या रंगात रंगवले. दुपारी सर्व शिक्षक व विद्यार्थीवर्गाने एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर शाळेची घंटा वाजवून “पुन्हा एकदा वर्ग भरला” अशी अनोखी आठवण जपली गेली. मुख्याध्यापक बाबूराव कांबळे आणि शिक्षक हनुमंत घरटं यांनी वर्ग घेत मार्गदर्शन केले.
या गेट-टुगेदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक बाबूराव कांबळे, हनुमंत घरटं, रेखा पाटील, सितल सोनगिरे, सुभाष टेंबे, के. के. पाटील, अरुण जाधव, ज्ञानेश्वर कोटकर, संतोष कासारे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र जंगम, सुरेश इंगळे, मराठे मॅडम, पांडुरंग मोहीते तसेच शिपाई रामदास भोसले, विठ्ठल मोहीते, रविंद्र सावंत, रमेश ढेपे आदी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी संदेश मोरे यांनी शिक्षकांसाठी दिलेल्या सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या सुवर्णकाळाच्या आठवणी उजाळल्या आणि सर्व शिक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी नाच, गाणी, डान्स आणि गरबा सत्राने वातावरण रंगले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अनिकेत पिळणकर यांनी उत्कृष्ट रितीने करून कार्यक्रमाला सुंदर आकार दिला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी मित्रमंडळींनी एकत्रित प्रयत्न केले. २५ वर्षांनंतर पुन्हा भरलेली ही शाळा, जुन्या आठवणींनी आणि स्नेहभावनेने ओथंबून गेली.





































