पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १९- तालुक्यात वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडत असून इंदापूर विभागात चक्क लोखंडी पूल चोरीला गेल्याचे चर्चा सर्वत्र रंगली आहे. माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील मौजे गंगेवाडी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांच्याकडे गावातील प्रशासकीय लोखंडी पूल चोरी झाला असून त्याची सखोल चौकशी करून न्याय मिळावा असा अर्ज केला आहे.
मुंबई गोवा महामार्गालगत ग्रुप ग्राम पंचायत पोटणेर हद्दीत मौजे गंगेवाडी गाव असून गावातील नदीवर एका दिशेने दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी प्रशासकीय लोखंडी पूल होता. या पुलाचा उपयोग ग्रामस्थ शेतीकडे येण्या जाण्यासाठी करत होते. परतू, दि. १० एप्रिल रोजी सदरील लोखंडी पूल चोरीला गेला असल्याच्या तक्रारी अर्ज ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन व ग्राम पंचायत पोटणेर यांना दिला आहे. या अर्जात याबाबत सखोल चौकशी करून न्याय मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत माहिती घेतली असता इंदापूर येथील एका भंगार दुकानदाराला गावातील काही ग्रामस्थांनीच २४००० रुपये घेऊन लोखंडी पूल कापून विकल्याची माहिती मिळाली.
याबाबत ग्रुप ग्राम पंचायत पोटणेर ग्रामसेवक राकेश मोरे यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी सदरील अर्ज ग्राम पंचायतीकडे दिला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज पोलीस प्रशासनाकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावा अशी मागणी इंदापूर विभागातून जोर धरू लागली आहे.





































