पोलीस प्रवाह न्युज
कागल, दि. २१- कागल तालुक्यातील मौजे सिद्धनेर्ली ग्रामपंचायत कार्यालयात आणि गावात अघोरी आणि जादूटोणाचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून, या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत दप्तर स्वच्छता करताना २०१५ ते २०२० या काळातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या एका काळ्या बाहुलीला गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी सिद्धनेर्लीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
दप्तर स्वच्छतेदरम्यान प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी सिद्धनेर्ली ग्रामपंचायत कार्यालयातील जुने दप्तर व रेकॉर्ड स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. यावेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अचानक एका काळ्या बाहुलीला काही चिठ्ठ्या गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या चिठ्ठ्यांवर सन २०१५ ते २०२० या कालावधीत कार्यरत असणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्या नावांचा उल्लेख होता.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कर्मचाऱ्याने हा प्रकार तातडीने विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास आणून दिला. हा सर्व प्रकार जादूटोणा आणि अघोरी प्रथेचा (करणी) भाग असल्याचे स्पष्ट होत असल्याने गावात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तातडीने बैठक घेऊन घेतला निर्णय
या गंभीर प्रकरणाची दखल घेत सिद्धनेर्ली गावातील आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांची तातडीने एक बैठक पार पडली. लोकशाहीच्या आणि विकासाच्या मंदिरात असा अघोरी प्रकार करणे अत्यंत संतापजनक असून, यामागील सूत्रधाराचा शोध घेणे गरजेचे असल्याचा सूर या बैठकीत उमटला. त्यानुसार सर्वांच्या स्वाक्षरीने कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
सखोल चौकशीची मागणी
या अर्जाद्वारे ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, तत्कालीन (२०१५ ते २०२०) सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कर्मचारी यांची पोलीस प्रशासनामार्फत सखोल चौकशी व्हावी. हा अघोरी प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याचा छडा लावून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या तक्रार अर्जावर सरपंच सौ. सुरेखा दादासो पाटील, उपसरपंच सौ. सविता दगडू घराळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि बहुसंख्येने उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता कागल पोलीस या गुढ आणि अघोरी प्रकाराचा तपास कसा लावतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










































