पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. १८- करमाळा पोलीस ठाण्याने दमदार कामगिरी करत खुनाचा गुन्हा २४ तासांत उघडकीस आणला आहे.
यात हकिगत अशी कि, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी मौजे केम गावातील दत्तात्रय तुकाराम देवकर यांचे शेती गट नं. ५२७ मध्ये विहिरीचे भरावाचे कडेला असलेले मकवानाच्या गंजीच्या आडोशाला मयत मल्हारी पोपट कांबळे, वय ३८ वर्ष, यांचे प्रेत मिळून आले होते. याचा तपास सपोनि पोपट टिळेकर हे करीत होते. त्यांनी मयताचे चौकशीत मयताचे नातेवाईक १) शीतल राजू केंगार (बहीण) २) राजेश बापू केंगार (भावजी) ३) पोपट यंका कांबळे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी मयतास दारू पिण्याचे व्यसन असलेचे सांगून त्याचे मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे सांगितले. मयताचे पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी मयताचे कारण गळा आवळल्याने दिले असल्याने अंमलदार पोपट बबन टिळेकर यांनी अज्ञात इसमाविरुध्द सरकारतर्फे फिर्याद दिली.
दाखल गुन्ह्याचे तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हे अन्वेषण पथकासह घटना घडले ठिकाणी तात्काळ भेट देवून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना मयताची बहीण शीतल राजू केंगार व भावजी राजेश बापू केंगार यांचेकडे तपास करत असताना त्यांचे हावभा, हालचालीवर संशय आल्याने त्यांचेकडे कसून तपास केला असता मयताची बहीण शीतल राजू केंगार हिने सांगितले कि, मयत मल्हारी कांबळे हा रोज दारू पिऊन माझेसोबत भांडण करायचा तुम्ही येथून निघून जा असे म्हणायचा यामुळे मी फार वैतागलेली होती.
दि. ११ एप्रिल रोजी भाऊ मल्हारी हा नेहमीप्रमाणे दारू पिवून घरी आला होता. त्याला नीट उभारताही येत नव्हते. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे माझेसोबत भांडण करू लागला. त्यावेळी मला राग सहन न झाल्याने मी माझेजवळील ओढणीने भाऊ मल्हारी कांबळे याचा गळा आवळून त्यास जीव मारले. त्यावेळी पती राजेश केंगार हे ही तेथे आले. त्यांना सर्व घडला प्रकार सांगितलेनंतर आम्ही दोघांनी मिळून मयत भाऊ मल्हारी कांबळे याचे प्रेत दोघांचे खांद्यावर घेवून रानारानातून जावून दत्तात्रय तुकाराम देवकर यांचे विहिरीचे भरावाचे कडेला असलेले मकवानाच्या गंजीच्या आडोशाला टाकून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी शीतल राजू केंगार व राजेश बापू केंगार दोघे रा केम ता. करमाळा यांना गुन्ह्यात अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोनी रणजीत माने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पोपट टिळेकर, श्रेणी पोसई जाधव, पोहेकॉ अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, पोना मनिष पवार, वैभव ठेंगल, पोकॉ अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रेंदिल यांनी केली.




































