पोलीस प्रवाह न्यूज
दि. ५, रायगड- कोकणात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. शाळांना देखील सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये दाखल होतात. माणगावकरांना वाहतूक कोंडी हा विषय काही नवीन नाही. सोमवार दि. ५ मे रोजी सकाळ पासूनच माणगांव बजापेठेत मुंबई गोवा महामार्ग, पुणे दिघी महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. माणगावकरांना वाहतूक कोंडीची साडेसातीच लागली असल्याचे चित्र दिसते.
माणगांव शहरात वाहतुक कोंडीची समस्या माणगांवकर नागरिकासाठी काही नवीन नाही. वीकेंड शनिवार, रविवार कधी तर शुक्रवारी संध्याकाळी पासून माणगाव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्ग चक्का जामच असतो. लग्नसराई व विकेंड असल्याने मुंबई व पुणेकडून रायगड रत्नागिरी तसेच श्रीवर्धन, हरिहरेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांची व शनिवार रविवार वीकेंड साठी येणारे नोकरदार यांची गर्दी वाढल्याने माणगांव शहरात वाहनांची तोबा गर्दी झाली होती. नागरिकांना चालताना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे.

माणगाव मधील काळ नदीवरील पूल हा इंग्रजी राजवटीत १८७१ साली बांधण्यात आला आहे. त्यानंतर माजी आमदार अशोक दादा साबळे यांच्या पाठपुराव्यामुळे २००५ मध्ये या पुलाची डागडुजी करून ६ फुटांचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलाला १५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी हापुल अजूनही भक्कमपणे उभा आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केले होते. नवीन पुलाचे बांधकाम २०१९ पासून सुरू झाले आहे. ते ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र हे काम अर्धवट स्थितीत असल्याने गेली अनेक वर्षे प्रवाशांची २-३ तास रखडपट्टी होत आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथे घेतलेल्या आढावा बैठकीत ह्या पुलांची कामे एप्रिल अखेर संपवून पूल वाहतुकीसाठी खुले केले जातील असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.
माणगाव शहरातील दररोजच्या वाहतूक कोंडीने व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाले आहे. या महामार्गाच्या बाजूने चालणे देखील मुश्किल आणि अवघड होऊन बसले आहे. याबाबत माणगाव मधील नागरिक लोकप्रतिनिधींवर राग काढून तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या ज्वलंत समस्येवर तातडीने मार्ग काढून जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. नदीवरील पूल यांची बांधकामे सुरूच असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे माणगाव शहरात वाहने थांबण्यासाठी जागा किंवा वाहनतळ नसल्याने प्रवासी थांबत नाहीत. ही वाहने थांबत नसल्याने व्यावसायिकांच्या व्यावसायावर दुष्परिणाम होत असून व्यापार ठप्प झाला आहे. रस्त्यावर चालणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे गिर्हाईक देखील दुकानात येत नाही अशा तक्रारी व्यापारी करीत आहेत.
माणगाव शहरातील महामार्गाचे रुंदीकरण किंवा चौपदरी करण झाले नाही. सर्व्हिस रोड आणि बायपास रस्ता नसल्याने शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कचेरी मार्ग, मोर्बा मार्ग, निजामपूर मार्ग आणि बामणोली या मार्गावर दररोजच्या दररोज वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीने माणगाव शहर वाहतूक कोंडीचे शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम होत आहे. माणगाव शहरात वाहन आल्यावर ते एक ते दोन तास अडकून पडते. त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. या कारणांमुळे काही प्रवासी पूणे आणि कोल्हापूर मार्गे कोकणात जातात. त्यामुळे येथील बायपासचे काम तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.
माणगाव वाहतूक पोलीस शाखा हायवेवर येऊन वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले. महामार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता प्रवास करताना सुरक्षित वाटत नाही. वाहतूक कोंडीमुळे तासनतास गाडीत ताटकळत बसावे लागते. त्यातच उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे प्रवाशी अक्षरशः घामाघूम झाल्याचे दिसून येत होते.
चौकट
माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला असलेल्या गोद नदी व काल नदी पुलाचे काम सुरू आहे. खा. सुनील तटकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ह्या दोन्ही पुलांची कामे एप्रिल अखेर संपवून पूल वाहतुकीसाठी खुले केले जातील असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खा. तटकरे यांनी आढावा बैठकीत दिले होते. परंतु, मे महिना उजाडला तरी ह्या दोन्ही पुलांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे खा. तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई होणार का? की मुंबई गोवा महामार्ग प्रमाणेच हा दोन्ही पुलांची कामे वर्षानुवर्ष रखडणार ?




































