पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या इंदापूर येथे तळाशेत जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार स्वाती अनिल नवगणे तसेच तळाशेत पंचायत समिती गणाच्या उमेदवार विद्या विपुल उभारे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला मंत्री भरत गोगावले, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर , शिवसेना नेते अनिल नवगणे ,महिला संघटिका नीलिमा घोसाळकर , संपर्ग प्रमुख अरुण चाळके , युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, प्रसाद धारिया आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेला संबोधित करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा आगामी विजयाचा स्पष्ट संकेत आहे. शिवसेनेने सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलांना उमेदवारी देत सक्षम महिला नेतृत्व घडवण्याचा ध्यास घेतला असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पक्ष कटिबद्ध आहे.
या विभागात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. पुढील काळातही याच वेगाने तळाशेत विभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यास शिवसेना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य व वैद्यकीय समस्यांवरही शिवसेना जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच या विभागात युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी शासनाच्या विविध योजना प्रत्येक गाव व वाडीच्या कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला रुग्णालय, विविध शासकीय योजना इत्यादी अडचणीच्या काळात नेहमी पुढे राहून सहकार्य केले आहे. विपुल उभारे यांनी केलेल्या कार्याचे मंत्री भरत गोगावले यांनी तोंडभरून कौतुक केले.
विरोधक आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी जनतेचा खरा पाठिंबा शिवसेनेलाच असल्याचा विश्वास व्यक्त करत, तळाशेतच्या विकासासाठी येत्या ७ फेब्रुवारीला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले.




































