पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३०- वर्ल्ड वूशू १७ वी चॅम्पियन स्पर्धा ब्राझील येथे दि. ३१ ऑगस्ट ते दि. ७ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. या चॅम्पियनशीप स्पर्धेत ७० किलो वजनी गटात भारत देशाचे प्रतिनिधित्व माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे सुपुत्र ऋषिकेश पुंडलिक मालोरे करणार आहे.
ऋषिकेश मालोरे याने स्थानिक पातळीपासून देश पातळीवर वूशू स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कामगिरीच्या जोरावर अनेक पदके मिळवली आहेत. त्यांना एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सन २०२३ -२४ चा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र राज्यपाल सिपी राधाकृष्ण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. माणगाव तालुक्यातील एका छोट्याशा खेडे गावातील ऋषिकेश आज जग पातळीवर भारताचे नेतृत्व करत असल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून या स्पर्धेत त्यांना सुवर्ण पदक मिळवून ते देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांचे वडील ॲड. पुंडलिक मालोरे यांनी व्यक्त केला.




































