आकुर्डे, कोनवडे, नाधवडे सह भुदरगडमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग; शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी
पोलीस प्रवाह न्युज
कोल्हापूर, दि. २४- शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा असंतोष आता तीव्र होताना दिसत आहे. महामार्गाच्या कामासाठी रोड मॅपिंग करण्याच्या उद्देशाने आलेल्या कर्मचाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी विरोध करत नाधवडे येथील घटनास्थळावरून पिटाळून लावल्याची घटना घडली. यावेळी मॅपिंगसाठी आणलेल्या मशीनला आग लावल्याचीही माहिती समोर आली आहे.
शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक शेतजमिनी, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महामार्गाला सुरुवातीपासूनच अनेक गावांमधून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोनवडे, नाधवडे आणि भुदरगड परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपला विरोध नोंदवला.
शेतकऱ्यांच्या जमिनीवरून महामार्ग नेण्यास आमची संमती नाही, अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी मॅपिंगच्या कामाला विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड न करता शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“शक्तिपीठ महामार्गाला आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांचा एकजुटीने तीव्र विरोध आहे. शेतजमिनी वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र असून, कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून हा प्रकल्प रद्द करावा.”
डॉ. रविंद्र पारकर, सरपंच, आकुर्डे (ता. भुदरगड)
“आमची शेती हीच आमची उपजीविका आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नाही. गावातील सर्व शेतकरी एकजुटीने या महामार्गाला विरोध करत असून, शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.”
प्रा. एच. आर. पाटील, शेतकरी, कोनवडे (ता. भुदरगड)













































