पोलीस प्रवाह न्यूज
रायगड : दि. १२ – रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या राजकीय कार्यपद्धतीची स्पष्ट दिशा दाखवून दिल्याचे चित्र दिसत आहे. पदभार स्वीकारण्याच्या औपचारिकता, सत्कार आणि स्वागत सोहळ्यांपेक्षा संघटनात्मक कामाला प्राधान्य देत त्यांनी थेट जनआंदोलनाच्या मैदानात उतरत पक्ष कार्यकर्त्यांना वेगळा संदेश दिला आहे. नियुक्तीनंतर अल्पावधीतच पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस सिलिंडर तसेच वाढत्या महागाईविरोधातील आंदोलन राजाभाऊ ठाकूर यांनी आयोजन करून जोरदार यशस्वी केले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या नेतृत्वाविषयी सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जिल्हाध्यक्षांच्या स्वागतासाठी आणि अभिनंदनासाठी विविध कार्यक्रमांची तयारी सुरू केल्याची चर्चा असताना राजाभाऊ ठाकूर यांनी मात्र या सर्वांकडे संयमाने पाहत संघटना उभारणीला अग्रक्रम दिल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, पक्षाचे तळागाळातील जाळे अधिक सक्षम करणे आणि रायगडमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा तिच्या सुवर्णकाळातील प्रभावी स्थानावर नेण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यावर त्यांचा भर असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय ए. आर. अंतुले यांच्या काळात रायगडमध्ये काँग्रेसने अनुभवलेली संघटनात्मक ताकद आणि जनाधार पुन्हा उभा करण्याची राजकीय इच्छा नव्या नेतृत्वामध्ये दिसत असल्याची भावना अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. काँग्रेसमधील अंतुले यांच्या राजकीय वारशाशी सातत्य राखणारे नेतृत्व म्हणूनही राजाभाऊ ठाकूर यांच्याकडे पाहिले जात असल्याची चर्चा आहे.
राजाभाऊ ठाकूर यांचे मूळ नाव राजेंद्र मधुकर ठाकूर असून ते अलिबाग येथील माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहेत. स्वर्गीय मधुकर ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय आणि जनाधार असलेले काँग्रेसचे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. कालांतराने राजेंद्र ठाकूर यांना जनतेनेच प्रेमाने “राजाभाऊ” हे संबोधन दिले. रायगडपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई महानगर परिसर, ठाणे व रायगड या भागातही त्यांना हेच नाव अधिक परिचित असल्याचे मानले जाते. दरम्यान, ८ डिसेंबर २०२४ रोजी ईव्हीएम यंत्रणेसंदर्भातील प्रश्नांवर देशपातळीवर चर्चेत आलेल्या मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी राजाभाऊ ठाकूर यांचे नाव पुढे आले होते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पदभार स्वीकारण्याबाबत आणि कार्यक्रम आयोजनाबाबत विचारणा करण्यात आली असता, “काँग्रेसचा कार्यकर्ता हा पक्षाच्या कामासाठी असतो; स्वागत आणि सत्कारासाठी वेळ काढण्यापेक्षा पक्ष बळकटीसाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे,” अशी भूमिका राजाभाऊ ठाकूर यांनी मांडल्याचे समजते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि विशेषतः आगामी निवडणुकीसाठी तयारी यावर सध्या भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगडातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राजाभाऊ ठाकूर यांच्या पहिल्या दौऱ्याबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अद्याप अधिकृत दौऱ्याच्या तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी कार्यकर्त्यांमध्ये तयारीला वेग आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे यांनी सांगितले की, नवीन जिल्हाध्यक्षांच्या पहिल्या दौऱ्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. विशेषतः रायगडात त्यांचे स्वागत अभूतपूर्व पद्धतीने करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. तर श्रीवर्धन येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, अधिकृत तारीख निश्चित झालेली नसली तरी तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राजाभाऊ ठाकूर यांच्या स्वागतासाठी रायगड सज्ज होत असून हा कार्यक्रम जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात वेगळा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












































