पोलीस प्रवाह न्यूज़
महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम २०२६ मध्ये गोल्ड मेडलची कमाई; क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवासाची पुन्हा एकदा चर्चा
माणगाव : दि २३ – वय हे केवळ एक आकडा असतो, जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचा प्रत्यय कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या संचालिका तथा मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. नाशिक येथे २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम २०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी रायफल शूटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावून रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुमुदिनी डुंबरे-चव्हाण यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९४-९५ या कालावधीत ॲथलेटिक्समध्ये चॅम्पियन म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात नाव कमावले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला प्रवास शिक्षण क्षेत्राकडे वळविला. कोकण विकास प्रबोधिनी या संस्थेची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू केले. आज रायगड जिल्ह्यात नावारूपाला आलेली मॉडर्न इंग्लिश स्कूल ही त्यांच्या दूरदृष्टी, मेहनत आणि शैक्षणिक ध्येयवादाचे प्रतीक ठरली आहे.
क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित न राहता त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. खासदार सुनील तटकरे आणि माजी खासदार अनंत गीते यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरून त्यांनी आपले धाडस आणि राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली. रायगड जिल्ह्यातील एक कणखर महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
आता वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल सुरू असतानाही त्यांनी क्रीडा क्षेत्रातील आपली आवड जिवंत ठेवत महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम २०२६ मध्ये सहभाग घेतला. रायफल शूटिंगसारख्या एकाग्रता, संयम आणि अचूकतेची कसोटी पाहणाऱ्या खेळात त्यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशाने वयाची मर्यादा ओलांडून स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या महिलांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
“वय महत्त्वाचं नसतं. अंदाज आणि आत्मविश्वास सोबत असेल, तर निशाणा कधीच चुकत नाही,” असे प्रेरणादायी उद्गार कुमुदिनी चव्हाण यांनी व्यक्त केले.
क्रीडा क्षेत्रातील जुनी चमक, शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि राजकीय क्षेत्रातील धाडसी वाटचाल यानंतर आता रायफल शूटिंगमध्ये मिळविलेले सुवर्णपदक त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देत आहे. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याचा गौरव वाढला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.












































