पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. १- शहराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रातील कुठल्याही मंत्र्याला, नेत्याला भेटाव लागले तरी चालेल.पण मी इथला विकास करणारच.विकासकामे करताना मी कुठलाही पक्षपात करणार नाही.मला साडेचार हजार मतदारांनी निवडून दिले असले तरी मी अठरा हजार जनतेचा नगराध्यक्ष आहे.असे प्रतिपादन श्रीवर्धन नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲड.अतुल चौगुले यांनी केले.
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲड.अतुल अरविंद चौगुले यांनी गुरुवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्रीवर्धन नगरपरिषदेचा कार्यभार स्वीकारला.या वेळी शिवसैनिकांनी सोमजादेवी मंदिर ते नगरपरिषद इमारती पर्यंत भव्य मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला तसेच कार्यकर्त्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता.
यावेळी राजकारण हे नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला तेव्हाच संपल. आता सुरुवात करायची आहे ती विकासकामांची.अद्याप पर्यंत माझी दोन कुटुंब होती , माझं घर दुसर न्यायालय आणि आता तिसरं म्हणजे संपूर्ण श्रीवर्धन.जे काही आहे ते मी कार्यातून करून दाखवीन, असे चौगुले म्हणाले.
निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले चौगुले यांना २०१६ रोजी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत किरकोळ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष,युवासेना शहर अधिकारी आणि दक्षिण रायगड उपजिल्हाप्रमुख असा राजकीय प्रवास चौगुले यांचा आहे.श्रीवर्धन नगरपरिषदेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषद प्रांगणात चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार शिवसेना , राष्ट्रीय काँग्रेस युतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.या वेळी महाविकास आघाडीचे कोणतेही ज्येष्ठ , वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नव्हते , ही अत्यंत खेदाची बाब आहे.
सत्कार समारंभ वेळी व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, श्रीवर्धन तालुका प्रमुख अरूण शिगवण शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस युतीचे कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष , भारतीय जनता पार्टी युतीच्या नगरसेवकांची अनुपस्थिती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंधरा आणि भारतीय जनता पक्षाचे दोन अशा युतीच्या सतरा नगरसेवकांनी साधी सदिच्छा भेट घेण्याची दखल घेतली नाही.फक्त शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन नगरसेवक चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी नगरपरिषदेत हजर होते.

































