पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर व माणगांव येथील बायपास रस्त्यांच्या रखडलेल्या कामांमुळे वारंवार वाहतुक कोंडी होत असून स्थानिक नागरीक, प्रवासी, वाहनचालक, व्यावसायिक, पर्यटक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आहे. सदर बायपास रस्त्यांची कामे पुर्ण होण्यास किमान २ वर्षे लागतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बायपासच्या रखडलेल्या कामामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीवर उपाययोजना म्हणून ‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या’ माध्यमातून काही पर्यायी रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून ती तातडीने सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये इंदापूर दाखणे माणगाव कालवा पर्यायी मार्गाचे काम होणे गरजेचे आहे, असे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी ना. भरत गोगावले यांना दिले आहे.
त्या प्रस्तावित कामांमध्ये माणगांवच्या वाहतुक कोंडीवर खऱ्या अर्थाने पर्याय ठरलेल्या ‘इंदापूर-वाढवण-पाणसई-कालवण-दाखणे-मुंढेवाडी-नाणोरे-माणगांव’ या कालवा मार्गाचा समावेश केला नसल्यामुळे वारंवार या पर्यायी रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते माणगांव या टप्प्यातील महामार्गाला समांतर पर्याय रस्ता म्हणून ‘वाढवण-कालवण-दाखणे-नाणोरे-माणगांव’ हा एकमेव मार्ग असून गेली अनेक वर्षे वाहनचालक या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करीत आहेत.
उपरोक्त सुचित केलेल्या पर्यायी कालवा मार्गाचे अर्ध्या भागाचे डांबरीकरण झाले असून उर्वरीत भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाल्यास हा कालवा मार्ग माणगांव येथे होणा-या वाहतुक कोंडीला प्रभावी पर्याय ठरेल असे जाणकारांचे व वाहनचालकांचे स्पष्ट मत आहे. तरी आदरणीय मंत्रीसाहेब ‘इंदापूर-वाढवण-पाणसई-कालवण-दाखणे-मुंढेवाडी-नाणोरे-माणगांव’ या कालवा मार्गाचा वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून शासनाकडून प्रस्तावित रस्त्यामंध्ये समावेश व्हावा व या कालवा मार्गाचे काम होऊन वाहनचानक, प्रवाशांना दिलासा द्यावा मिळेल असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





































