मुंबई । कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमो व्हायरस एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सर्दी – खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसंच स्वच्छतेसंबंधी नियमावली जाहीर केली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यात एचएमपीव्ही विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत तसचं खबरदारीच्या उपायांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसनाच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. देशात इन्फ्लूएंझासदृश आजार किंवा गंभीर तीव्र श्वसन आजारात वाढ झालेली नाही. देशात श्वसनाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं तसचं परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अद्ययावत माहिती देत आहे.
महाराष्ट्र अलर्ट
एचएमपीव्हीसंदर्भात अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांसाठी परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागही अलर्ट मोडवर आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका, असे सांगण्यात आले आहे. तर, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या, असे म्हटले आहे.



































