पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २०- म्हसळा तालुक्यातील वांगणी गावात, लायनेल परेरा यांच्या फार्म हाऊस मधील पोल्ट्री शेड मध्ये साधारण १० फुटी अजगर कोंबड्या खाऊन मस्तावला होता. सदरची बाब दि. १९ जून रोजी बागेत काम करणाऱ्या कामगारांना दिसून आली. अजगराने दोन कोंबड्या खाल्ल्या होत्या व एक कोंबडी झटापटीत मरण पावली होती. चारी बाजूने बंद पोल्ट्रीमध्ये जवळच्या झाडावर चडून छप्पराखाली असलेल्या पोकळीतून अजगर आत आल्याचे निदर्शनास आले.
अजगर आकाराने मोठा असल्यामुळे येथील स्थानिक कामगार घाबरले व त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अजगर सकाळपासून पोल्ट्रीशेडमधेच शांतपणे बसून होता. सदरची घटना लायनेल परेरा यांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना सांगितली. त्वरित वनविभागाला देखील संपर्क साधत संध्याकाळी सुरक्षितरित्या अजगराचे “इन सिटू” बचावकार्य करण्यात आले. स्थानिकांना योग्य ते मार्गदर्शन व वन्यप्राणी आणि सापांबद्दल जनजागृती करून अशा प्रकारे मानव वन्यजीव-संघर्ष सहजीवन राखत टाळला जाऊ शकतो.
अजगराला न पकडताच माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांच्या सोबत सहकारी मित्र आनंद पत्की आणि म्हसळा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे, देहेन वनपाल महादेव कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुदर्शन राठोड यांनी केली अजगराच्या बचावकार्याची कार्यवाही.

अजगराने स्वतःहून सुरक्षितरित्या स्वतःचा मार्ग निवडून जवळच्या जंगल परिसरात केले प्रस्थान. जंगल परिसर किंवा नैसर्गिक अधिवास असलेल्या परिसरां-जवळील गावांमधून अथवा शहरांच्या वेशीवरून वन्यप्राणी व साप पकडून इतरत्र कोठेही स्थलांतरित करण्याची शक्यतो गरज नसते. घटनास्थळीच त्याच परिस्थिती मध्ये सापांना स्थलांतरित न करता जागच्याजागी कशा प्रकारे बचावकार्य करू शकता येते याचे उत्तम उदाहरण या बचावकार्याच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
अजगर हा वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत अनुसूची – १ मध्ये येत असून त्याला कायद्याने वाघांइतकेच सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त आहे.सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये अनेक ठिकाणी अजगर भक्ष्याच्या शोधात किंवा मग आडोश्यासाठी भरकटून गावांमध्ये किंवा मानवी वसाहतींजवळ आढळून येतात. मोठ्या आकारामुळे सहसा माणसांमध्ये अजगारांबद्दल भीती असते पण अजगर हा अगदी निरुपद्रवी साप असून सध्याच्या दिवसात कोठेही आढळून आल्यास त्याला इजा न पोहोचवता त्वरित जवळील सर्पमित्र अथवा बचावपथके किंवा वनविभागाला संपर्क साधावा असे आवाहन शंतनु कुवेसकर यांनी केले आहे.
म्हसळा वनपरिक्षेत्र जैवविविधतेने अतिशय संपन्न असून येथे अनेक वन्यप्राणी,पक्षी व सापांचा नैसर्गिक वावर आहे. येथील वनपरीसर मोठा असून परिक्षेत्रातील गावांमध्ये सध्याचा पाऊस व पूरपरिस्थितीमुळे साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात. नागरिकांनी खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा. म्हसळा वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्यशील आहे.
-संजय पांढरकामे, वनपरिक्षेत्र अधिकारी, म्हसळा





































