पोलीस निरीक्षक अर्चना पाटील – फुलसुंदर ( जोगेश्वरी पोलीस स्टेशन , मुंबई शहर )
पोलीस प्रवाह न्यूज
अर्चना पाटील या उत्कृष्ट गायक आहेत चित्रपटातील अनेक मोठ्या गायकांनी गायलेले गाणे ते सुंदर रित्या सादर करतात महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक म्हणून नावलौकिक असलेल्या अर्चना पाटील या त्यांच्या गायनाचा शैलीमुळे हे नावारूपाला आलेल्या आहेत.
अर्चना यांचे वडीलांचे मुळ गाव कोल्हार खुर्द शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. आई गृहिणी तर वडील प्रवरा सहकारी साखर कारखान्यात नोकरीला पाठीवर एक भाऊ व दोन बहिणी. अर्चनाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हार येथे झाले. पाचवी ते दहावीपर्यंत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार येथे तर बी.एस्सी. व एम. एस्सी कृषी हे शिक्षण कृषी महाविद्यालय, पुणे येथे आले. पदवीच्या शेवटच्या वर्षात असतानाच अचानक वडीलांचे अपघातात निधन झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तरीही अशा परिस्थितीत अर्चनाची आई अनुराधा सदाशिव पाटील यांनी स्वतःला सावरून आपल्या चारही मुलांचे राहिलेले शिक्षण जिद्दीने पूर्ण केले व त्यांना घडवले.

अर्चना यांनी आपल्या आईच्या मदतीने पुढील शिक्षण पूर्ण केले व एम. एस्सी नंतर लगेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. नोकरी सांभाळत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि त्यातूनच पोलिस उप निरीक्षक या पदावर निवड झाली. नातेवाईकांमध्ये पोलिस खात्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, त्याक्षेत्रात जावे की नाही अशा पेचात असतानाच अर्चनाच्या आईने हिंमत करून त्यांना मार्गदर्शन केले अर्चना यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले प्रशिक्षण दरम्यान त्यांना सावित्रीबाई फुले बेस्ट वुमन कॅडेट या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे पती व सासरचे सर्व कुटंबीय यांचा त्यांची नोकरी व छंद यांना मनापासून सपोर्ट आहे त्यामुळं ते नोकरी सांभाळून छंदही जोपासू शकले.
सतत समाजासाठी काम करण्याची जिद्द होतीच प्रशिक्षण झाल्यावर अर्चना यांनी आतापर्यंत औरंगाबाद ग्रामीण, औरंगाबाद शहर, पुणे शहर येथे विविध गंभीर गुन्ह्यांचा तपास, महिला व बालके यांच्याविषयीच्या गुन्ह्यांचा तपास, आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास केलेला आहे. जुलै २०२० मध्ये त्यांची पोलिस निरीक्षक या क्लास वन पदावर पदोन्नती झाली त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद येथे सायबर पोलिस स्टेशनच्या प्रमुख म्हणून काम पाहिले. त्या दरम्यान परराज्यातील बऱ्याच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या आहेत. त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे येथे पोलीस उपअधीक्षक या पदावर ही ऑगस्ट २०२१ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान कर्तव्य पार पाडलेले आहे. सध्या ते जोगेश्वरी पोलीस स्टेशन , मुंबई शहर येथे कार्यरत आहेत

अर्चना पाटील यांना आतापर्यंत त्यांच्या पोलिस दलाच्या सेवेत जवळपास १४५ बक्षिसे व प्रशंसापत्रे मिळाली आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात आतापर्यंत १ सुवर्ण, ४ रजत, ३ कांस्य अशी पदके मिळाली आहेत. २०१९ मध्ये अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड होऊन त्या महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने असलेल्या टिममध्ये लखनौ येथे सहभागी झाल्या होत्या. २०२० मध्ये भोपाळ मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्या मध्ये त्यांना क्रिमिनल लॉ या विषयात कांस्य पदक प्राप्त झाले होते. औरंगाबाद येथे असताना २०१७ मध्ये त्यांना लोकमत समूहातर्फे बेस्ट वुमनने सन्मानित करण्यात आले होते.
अर्चना यांचे लग्न मुळचे पिंपळवंडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील असलेले व सध्या पुण्यात स्थायिक असलेले बिपीन पुलसुंदर यांचेशी झाले आहे. लग्नानंतरहीं अर्चना यांना त्यांचे पती व सासरचे कुटुंबीय यांच्याकडून पोलिस खात्याच्या नोकरीसाठी पूर्ण सहकार्य आहे. अर्चना यांना गायनाची आवड असल्याने त्यांचे पती बिपीन यांनी त्यांना स्टुडिओमध्ये गाण्यास उत्स्फूर्त केले, त्यावेळी अर्चना यांचे त्यांनी गायलेले तुझसे नाराज नहीं जिंदगी हे गाणे प्रचंड व्हायरल झाले.
अर्चना या पोलिस दलाच्या वतीने सर्व महिलांना व मुलींना संदेश देऊ इच्छितात की, अन्याय सहन करू नका, कुणावर अन्याय होत असेल तर बघ्याची भूमिका घेऊ नका, सोशल मीडियाचा वापर जपून करा, कुठल्याही भुलथापा, आमिषाला बळी पडू नका, कितीही प्रतिकुल परिस्थिती असेल तरी हार मानू नका, जिद्द ठेवा, स्वावलंबी बना, आपल्या सुरक्षेसाठी, न्यायासाठी बनविलेल्या कायद्याचा गैरवापर करू नका. अशा या खाकी वर्दीतील गायकाला पोलीस प्रवाहचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.



































