पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २- नाताळ व नववर्ष साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच अपघाता देखील मोठ्या प्रमाणात होतात. अशाच एक अपघात ताम्हिणी घाटात दि. २ जानेवारी रोजी घडला. पर्यटकांना घेऊन जाणारी खाजगी बस डोंगराला ठोकल्याने अपघातात सुमारे ५० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील सावन आय. बी. ऑटोव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड (शिव महिंद्रा) शोरुम मधील कर्मचारी दि. २ जानेवारी रोजी दोन खाजगी बसमधून रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे पर्यटनासाठी निघाले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत आल्यावेळी बस टाटा कंपनीची बस क्रमांक एम एच १४ एम टी ९३९४ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील अवघड वळणावर ही बस डोंगराला ठोकली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसची समोरील बाजू पूर्णपणे चकाचुर झाली. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व पोलिस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णवाहिका खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आले. काही जखमींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. यावेळी रुग्णालयात समीर मोहिते, मुकुल मेहता, बाळा पवार ,सारंग कनोजे, उस्मान बागवान व पोलिस कर्मचारी , रुग्णालयातील कर्मचारी हे मदती साठी पुढे सरसावले होते. तर यावेळी उपजिल्हा रुग्णालयात बघ्याची देखील मोठी गर्दी झाली होती.उपजिल्हा रुग्णालयात जखमींनी एकच टाहो फोडला होता.

ताम्हिणी घाटात दिनांक २५ डिसेंबर पासून सतत अपघात होत आहेत. सदरील अपघात ठिकाण हे अतितीव्र वळण असून उतार भाग आहे. या ठिकाणी दिनांक १ जानेवारी रोजी देखील ३ वाहनाचे अपघात झाले होते. ताम्हिणी घाटात सतत अपघात होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ताम्हिणी घाटात सतत होणाऱ्या अपघातामुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



































