पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २०- तालुक्यातील देवळी गाव देवळी कोंड व देवळी ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच विनेश डवले यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, देवळी मुंबईकर मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, शाळेचे विद्यार्थी तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात देवळी गाव व देवळी कोंड येथील ग्रामस्थ, तसेच मुंबईत राहणाऱ्या गावकऱ्यांनी मिळून ३५० झाडांची लागवड केली. केवळ झाडे लावणे नव्हे तर ती जगवून त्यांच्या पूर्ण वाढीपर्यंत संगोपन करणे हा संकल्प सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे मुंबईहून विशेषतः या उपक्रमासाठी आलेल्या तरुण मंडळाचे आणि सध्या शेतावर लावणीची कामे सुरू असतानाही कार्यक्रमाला हजर राहिलेल्या शेतकरी व महिलावर्गाचे मनापासून आभार मानण्यात आले.या कार्यक्रमात रा.जि.प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक यांचीही उपस्थिती लाभली. सरपंच विनेश डवले यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
































