पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ६- भाऊ… मला खूप भूक लागली आहे. मी कालपासून उपाशीपोटी हाये… माझं इकडे कोनबी नाय. मला गोव्यातील मडगाव ठिकाणी खूप मारहाण झाली हाये… कानाला आणि डोक्यात जखमा झाल्या हायेती. ७ – ७ टाकं पडलं हायती. पोटात भूकंची आग पडली आहे. मला सगळं लुटलं आहे. लातूरला माझी बायका पोरं वाट बघतं असत्यानं… मला गावाकडं जायचं हाय. मला जायला थोडी पैशाची गरज हाये… तुमच्या पाया पडताय… त्याचे आर्जव आणि हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक ऐकून सकाळच्या प्रहरी पत्रकार अरुण पवार यांनी त्याला धीर देऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे ठरविले.
शनिवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी यल्लाप्पा मुकींदा चव्हाण राहणार तालुका निलंगा, जिल्हा लातूर हा साधारणतः ४५ वर्षांचा इसम माणगाव शहरातील मोरबा रोड येथे वणवण भटकंती करीत घाबरत- बिथरत काही तरी दोन घास पोटात जाण्यासाठी साईशा हाँटेल समोर दया- याचना करीत होता. त्याची चौकशी केली असता त्याला खूप जखमा झाल्या होत्या. त्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात पुढे केला.
यल्लाप्पा हा पोटापाण्यासाठी गोवा राज्यातील मडगाव येथे मजूर म्हणून कामाला होता. तेथे एका हाँटेलमध्ये जेवण करताना मद्यधुंद अवस्थेतील तरुणांच्या टोळक्याने शुल्लक कारणावरून त्याला जबरी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर तेथील पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला हॉस्पीटल मध्ये दाखल करून उपचार केले. तेथे कान आणि मस्तकावर १४ टाके घालून दोन दिवसांनी मुंबई कडे येणाऱ्या टेम्पोत बसविण्यात आले. त्यांनी त्याला माणगावला सोडले. तिकडे त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
माणगावला आल्यावर त्याला अरुण पवार यांनी नाष्टा आणि चहापाणी दिले. त्याला लातूरला जाण्यासाठी पुरेसे एक हजार रुपये आणि सोबत नाष्टा पाणी बांधून दिला. त्यानंतर त्याला दुचाकीवरून एस.टी. बस स्थानकात सोडून माणगाव – स्वारगेट – जामखेड या बसमधून पूणे येथे जाऊन लातूरला जाण्यासाठी कंडक्टरला विनंती केली. त्याचवेळी पत्ता देऊन मोबाईल नंबर लिहून दिला. प्रवासात काहीही अडचण आल्यास फोन कर असे अरुण पवार यांनी सांगितले.
यल्लाप्पाला गोव्यात मद्यपी गुंडांनी अक्षरशः लुटले होते. कान फाटला होता. डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. पाठीवर आणि पोटात मोठ्या प्रमाणात मुका मार लागला होता. मुख्यतः त्याच्या गुप्तांगाला खोलवर मुका मार होता. त्यामुळे यल्लाप्पाला असह्य वेदना होत होत्या. दातांचा जबडाही पाणी आणि नाष्टा करण्यासाठी उघडत नव्हता. इतक्या मरण यातना भोगत एक दिवस खडतर प्रवास करत आला होता. तो मारहाणीच्या घटनेनी हुंदके देत रडत होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू धारा सतत वाहत होत्या. येथे उपचार करण्यची विनंती केली. परंतु त्याला बायको, मुलगा आणि मुलगी यांची आठवण सतावत होती. मी घरी गेल्यावरच उपचार करून घेईन असे यल्लाप्पाने सांगितले. घरची मंडळी वाट बघत असतील. त्याचा मोबाईल, पैसे, आधारकार्ड, कपडे काढून टाकले होते. तेथील पोलीसांनी त्याला जूना टी शर्ट देऊन टेम्पोत बसवून पाठवले होते.
जाताना यल्लापाचे डोळे पून्हा पाणावले होते. अश्रू थांबतच नव्हते. सारखा पत्रकार अरुण पवार यांना सायेब.. सायेब.. हाक मारत होता. तुमचं उपकार कधीबी इसरणार नाय बघा… तुमचा मोबाईल नंबर लिहून घेतलं हाये. गावाशी पोचल्यावर मी मी नक्की तुम्हाला फोन करीन… त्यावेळी डोळे पाणावले होते. एका डोळ्यात मदत केल्याचे आनंदी अश्रू तर दुसर्या डोळ्यात यल्लाप्पाला सोडताना अरुण पवार यांचे विरहाच्या दुःखाचे अश्रू थांबतच नव्हते. आता यल्लाप्पाच्या फोनची वाट पत्रकार अरुण पवार पहात आहेत. अशा प्रकारे पत्रकार अरुण पवार यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करुन एका अनोळखी आणि असह्य व्यक्तीला माणूसकीचे दर्शन घडविले.




































