पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १०- माणगावच्या भूमीने पुन्हा एकदा कर्तृत्वाचा अनमोल ठेवा जगासमोर उघड केला आहे. शहरातील अतिशय मेहनती, जिद्दी आणि प्रतिभावान रोलर स्केटिंगपटू कुमारी अन्विता संजना संजय बुटे हिने केलेली कामगिरी केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा अभिमान वाढवणारी ठरली आहे.
२२.२२ सेकंदांत १०० मीटरचा अचूक विक्रम.
कर्नाटकातील बेळगाव येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या शिवगंगा रोलर स्केटिंग स्पर्धेत अन्विताने १०० मीटर अंतर केवळ २२.२२ सेकंदांमध्ये पूर्ण करून वेधक कामगिरी केली. या अद्वितीय कौशल्याची अधिकृत दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिचे नाव जागतिक विक्रमधारक म्हणून नोंदवले आहे. एका साध्या वातावरणातून आलेल्या मुलीने केलेली ही कर्तबगारी संपूर्ण माणगावची मान वाढवणारी ठरली आहे.
लहानपणापासूनची ओढ .. कुटुंबाची निश्चयी साथ
विद्यानगर, माणगावची रहिवासी आणि सध्या सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेली अन्विता, लहानवयातच स्केटिंगच्या प्रेमात पडली. तिच्यातील क्षमता ओळखून तिचे आई-वडील संजय व संजना बुटे यांनी कठीण परिस्थितीतही तिच्या प्रत्येक स्वप्नाला पंख लावले. हीच जिद्द आणि पाठिंबा घेऊन अन्विताने ७८ मिनिटे अखंड स्केटिंग करत जागतिक पातळीवर नवा मानदंड निर्माण केला. आजवर हा विक्रम कोणीही तोडू शकलेले नाही, ही बाब तिच्या चिकाटीचे लोभस प्रतीक म्हणावी लागेल.
हॉकीपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत सर्वत्र दणकास्केटिंगसोबतच तिने आइस स्केटिंग बॅंडी हॉकीमध्येही राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकले, हे तिच्या बहुमुखी प्रतिभेचे द्योतक आहे. देश-परदेशातील स्पर्धांत तिने आजवर मिळवलेली १०० हून अधिक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तिच्या उज्ज्वल वाटचालीची साक्ष देतात. नुकत्याच इंडोनेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने पुन्हा एकदा पराक्रम करत सुवर्णपदकाची कमाई केली आणि भारताचा तिरंगा उंचावत जगभरात आपली छाप उमटवली. मुंबई, दिल्ली, गोवा, मद्रास अशा अनेक मोठ्या शहरांतील स्पर्धांमध्ये तिचे सुवर्णयश कायम राहिले आहे. क्रीडा विकास परिषदेने दिलेल्या भारत भूषण, हिंद रत्न, तसेच एशियन बुक रेकॉर्ड, इंडो एशियन रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्ससारख्या बहुमानांनी तिच्या परिश्रमांना योग्य तो मान मिळाला आहे.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन … अन्विताची आत्मशिस्त
अन्विताच्या प्रगतीमागे प्रशिक्षक संतोषकुमार मिश्रा यांचे बारकाईने घेतलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. कठोर सराव, शरीरातील लवचिकता, समतोल, एकाग्रता आणि तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी अन्विता रोज अनेक तास अभ्यास करते. तिच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय म्हणजे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे आहे. अन्विता म्हणते, “माझे स्वप्न आहे की जागतिक ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र आणि माणगावचे नाव जगभर उजळवावे.” तीच्या या उज्वल यशामध्ये स्पोर्ट्स अकादमी आणि एस. एम. स्पोर्ट्स अकादमी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.
माणगावकरांचा अभिमान… शुभेच्छांचा वर्षाव
अन्विताच्या या जागतिक कर्तृत्वानंतर माणगाव शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी अन्विताचे कौतुक करत, “ही मुलगी माणगावचा अभिमान आहे. तिचे हे यश तिला आणखी मोठ्या उंचीवर नेईल,” अशा शब्दांत तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अन्विता – एका पिढीची प्रेरणा
अन्विताचे यश हे केवळ तिच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण माणगावच्या मातीचे यश आहे. एका सामान्य घरातील मुलीने जगाच्या पातळीवर कर्तृत्व सिद्ध करणे ही नवीन पिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. तिची क्रीडाप्रेमी वृत्ती, चिकाटी आणि मेहनत अनेक मुलांना त्यांच्या स्वप्नांकडे ठामपणे वाटचाल करण्याची दिशा देणारी आहे.
अन्विता बुटे… माणगावची शान… भारताची उदयोन्मुख तारा ठरत आहे.





































