पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १७- रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विविध पक्ष आप आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन कामाला लागले आहेत. विविध ठिकाणी भूमिपूजन, लोकार्पण व पक्ष प्रवेश सोहळे पक्षामार्फत पार पडत आहेत. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या मोर्बा जिल्हा परिषद गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
मोर्बा जिल्हा परिषद गणात सर्वसाधारण आरक्षण पडले असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून रमेश मोरे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी आपली जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असून शेकाप कडून अस्लम राऊत, शिवसेना शिंदे गट कडून सुजित शिंदे यांचे नाव चर्चेत असून शिंदे सेना स्वतः आपल्या पक्षाचा उमेदवार देऊन रिंगणात उतरणार की शेकापचे अस्लम राऊत यांना पाठिंबा देणार ? याची जोरदार चर्चा सुरू आहे. रमेश मोरे यांची पत्नी आरती मोरे या आधी मोर्बा जिल्हा परिषद गणातून बहुसंख्य मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधीची विकास कामे मोर्बा जिल्हा परिषद गणात करण्यात आली असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यात प्रत्येक गावात रमेश मोरे यांचा दांडगा जनसंपर्क असून काही दिवसापूर्वी त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या गटात मुंबई येथे त्या भागातील सरपंच , उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन त्यांनी पक्ष प्रवेश घेतला असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मोर्बा विभागातील राजकीय वातावरणाला सध्या चांगलाच तापत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रमेश मोरे निवडणूक लढविणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे या भागात भूमिपूजन, लोकार्पण सोहळा, पक्ष प्रवेश, नव नियुक्त्या व गाव बैठका यांचा जोर वाढला आहे. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेणं सुरू आहे. रमेश मोरे यांचा मोर्बा भागातील तगडा जनसंपर्क असल्याने अनेक गाव हे त्यांच्या पाठीशी असल्याने शिंदे सेना विरोधात उमेदवार देईल की शेकाप चे अस्लम राऊत यांना पाठिंबा देऊन समाधान मानेल यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



































