पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १३- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला रायगड जिल्ह्यात जोरदार धक्का बसला आहे. निष्ठावंत शिवसैनिक माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी दि. १८ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर रित्या प्रवेश करणार आहेत, अशी माहिती दि. १३ मे रोजी माणगाव विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, ज्येष्ठ नेते तुकाराम सुतार, तालुकाध्यक्ष काका नवगणे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, गजानन अधिकारी, सिद्धांत देसाई उपस्थित होते.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात गजानन अधिकारी यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात उबाठा गटाला हा जोरदार धक्का आहे. अनेक वर्ष गजानन अधिकारी यांनी शिवसेना पक्षात समाजकार्य करीत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. स्नेहल जगताप यांच्या पाठोपाठ शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी पक्ष प्रवेश करीत असल्याने कोकणात उबाठा गटाला वालीच राहिला नाही. यावेळी गजानन अधिकारी म्हणाले की, मी गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षात प्रामाणिकपणे काम केले. माझ्या राजकीय कार्यकर्तीत कधीच वैयक्तिक हित व स्वार्थ पाहिला नाही. ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिकवणीत राजकारणाला जोड समाजकार्य केले. साई परिसरात एक शैक्षणिक संकुल उभे केले. ग्रामीण भागात शैक्षणिक संकुल चालवणे अतिशय अवघड झाले आहे. या शैक्षणिक संकुल आता आधाराची गरज आहे. तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्त केला आहे. आज ज्या काही समस्या समोर आहेत. त्यांचा विचार करून आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

































