पोलीस प्रवाह न्यूज
श्रीवर्धन , ता. २६ – श्रीवर्धन येथे वाढते पर्यटन या दृष्टीने समुद्र किनार्यावर आलेल्या पर्यटकांची नैसर्गिक विधी बाबतीत कुचंबणा होऊ नये याकरिता किनार्यावरील मठाचा गवंड परिसरात ॲस्पिरेशनल टॉयलेट उभारण्यात आले आहे. परंतु , सद्यस्थितीत शौचालय बंद अवस्थेत असल्याने आलेल्या पर्यटकांची नैसर्गिक विधी बाबतीत गैरसोय होतांना दिसते.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत पस्तीस लाख रकमेच्या ॲस्पिरेशनल टॉयलेटचा लोकार्पण सोहळा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते दिनांक २५ आक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला होता.परंतु , लोकार्पण सोहळा पार पडताच काही वेळाने शौचालयास कुलुप लावण्यात आले.थाटामाटात उद्घाटन झालेल्या अद्ययावत शौचालय इमारतीस लगेचच कुलुप का लावण्यात आले हा प्रश्न सर्वांनाच पडला.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कौंटुबिक सहली बरोबरच शालेय सहलींचे प्रमाण वाढले आहे.किनार्यावर फिरावयास गेलेले पर्यटक , विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक नैसर्गिक विधी करीता ॲस्पिरेशनल टॉयलेट येथे गेले असता दारांना लावलेले कुलुप निदर्शनास येते.नगरपरिषदेची मठाचा गवंड व शासकीय विश्रामगृह नजीकच्या किनार्यावर प्रसाधनगृह आहेत पण अनेकदा बंद आणि अस्वच्छता असल्याने पर्यटकांची गैरसोय होतांना दिसते.ॲस्पिरेशनल टॉयलेट लवकर सुरू करावे तसेच उर्वरित दोन प्रसाधनगृहांची नगरपरिषदेने दखल घ्यावी , अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदे कडून खुलासा
ॲस्पिरेशनल टॉयलेट हे कंत्राट पध्दतीने चालवण्यासाठी देण्यात येणार आहे.कंत्राट पध्दतीने दिल्याने शौचालयात स्वच्छता राखली जाईल. नगरपरिषदेवर काही दिवसात स्थायी समिती स्थापन झाली की निर्णय घेतला जाईल.




































