पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १८- गेली २४ तास कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. माणगांव तालुक्यात गेली २४ तास धुवांधार पाऊस पडत असून तालुक्याला पावसाने झोडून काढले आहे. तालुक्यात धुवांधार पाऊस पडत असल्याने सर्व नाले, नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. या धुवांधार पावसाने माणगांवमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.
माणगांव तालुक्यातील गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काळ नदी, गोद नदी तुडुंब भरून वाहत आहे. माणगाव येथील कलमजे फाट्या जवळील पुलाजवळ पाणी आल्याने तसेच राऊत हॉस्पिटल समोर देखील पुराचे पाणी महामार्गावर आल्याने तात्पुरता मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी या परिस्थितीत घाबरून न जाता आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन माणगाव पोलिसांनी केले आहे.