![]()
॥तिळगुळ घ्या गोड बोला ॥ मकर संक्रातीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्राती असे म्हणतात.
सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रात असे म्हटले जाते .सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रात असे म्हणतात.
इतर संक्रांति पेक्षा मकर संक्रातीला विशेष महत्त्व आहे.
मकर संक्राति बाबत अफवा
दरवर्षी मकर संक्राती संदर्भात ही संक्रात अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे त्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
पंचांगाधार -दाते पंचांग
लेखन -प्रभाकर जंगम
मकर संक्रात
मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025
संक्रांतीचा पुण्यकाल
सकाळी 08:55 ते दुपारी 04:55 पर्यंत आहे .
शास्त्रात सांगितलेली संक्राति पर्वकाळात स्त्रियांनी करावयाचे दान
नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, तीळ, गुळ, सोने,भूमी, गाय, वस्त्र, घोडा इ.
तिळगुळ देताना…देवघेवीमध्ये अशा अशा वस्तूंना अस्वच्छ हाताचा, नाक पुसलेल्या रुमालाचा व मळलेल्या खिशाचा स्पर्श न होऊ देण्याची आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
संक्राती दिवशी एकमेकांना देण्यात येणारा तिळगुळ, तिळगुळाच्या छोट्या वड्या, लाडू,रेवड्या अशा वस्तू खिशात न ठेवता, म्हणजे डब्यात किंवा चांगल्या पिशवीत ठेवण्यात थोड्याच वस्तूचे पण मनापासून केलेले दान अधिक फलदायी ठरते.
संक्राती पर्वकाळात केलेले दान खरोखर चित्तशुद्धी करणारे समाजा विषयी प्रेम व आपुलकी वाढवणारे असते.
शास्त्रात…देहदान, रक्तदान, नेत्रदान, मूत्रपिंडदान इत्यादीचा उल्लेख नाही. पण मृत्यूपूर्वी मकर संक्रांतीच्या पर्व काळात देहदान, रक्तदान,मूत्रपिंडदान केल्यास तसेच मरणोत्तर देहदान नेत्रदानाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केल्यास ही दाने अधिक पुण्यदायी फलदायी ठरू शकतील असे मला वाटते.
या दिवसाचे कर्तव्य
तील मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उटणे अंगास लावणे तिल होम तिल तर्पण तीलभक्षण व तिल दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.
पर्व काळात काय करू नये?
संक्रातीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे ,वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामविषय सेवन इ. कर्मे वर्ज सांगितलेली आहेत.
भोगी
मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते.
आपला पंचभौतिक देह म्हणजे घट, याचे प्रतीक म्हणून घटामध्ये धान्य, गाजर,ऊस इत्यादी अनेक भाज्या ठेवून घटाचे पूजन करण्याची परंपरा आहे.
या महिन्यात शिरीर ऋतूतील हिवाळा भाज्यांसाठी पोषक असतो. त्यामुळे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेताला नवीन बहर आलेला असतो.
या भोगी सणानिमित्त भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लॉवर इ. भाज्या वापरल्या जातात. आणि त्या सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि राळ्याच्या तांदळाचा भात करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी प्रसादात असते.
तिळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिल होम, तिलार्पण, तीलभक्षण व तिळ दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्र सांगते.
म्हणून या दिवशी एकमेकांना
॥गुळ घ्या गोड बोला॥
तिळगुळ देऊन हा आनंद उत्सव साजरा केला जातो.
म्हणून या दिवशी वाणाला विशेष महत्त्व आहे. सुवासिनी स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून एकमेकिंना वाण देतात.
मकर संक्रातीचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व पाहता…
मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी अनेक भाज्यांचे सेवन असते. कारण अनेक भाज्यातील पौष्टिक तत्व मानवाच्या शरीरास मिळावे. तसेच थंडीच्या वातावरणात तिळमिश्रित बाजरीची भाकरी खावून शरीरामध्ये उष्णता टिकून रहावी.हा त्या पाठीमागे उद्देश असावा असे मला वाटते .
त्याच बरोबर या ऋतूमध्ये अनेक भाज्यांचे पचनही व्यवस्थित होऊ शकते.
मकर संक्राती दिवशी तिळाचे तेल लावून अभ्यंग स्नान सांगितले आहे. कारण थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलाचे महत्व आयुर्वेदानुसार वेगळे सांगायला नको. तसेच या ऋतूत तिळ गुळ खाणे आरोग्यास चांगले असते असे आयुर्वेद सांगते.
मकर संक्रमण पुण्यकाळात दानाला विशेष महत्त्व असल्यामुळे तिळगुळ स्नान,दानादि कृत्ये करून हा आनंद उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो.
मकर संक्रातीचे गणित
मकर संक्रांति ही सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. ती 14 जानेवारीला येते असे मात्र मुळीच नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस,6 तास,9 मिनिटे व 10 सेकंद एवढा कालावधी लागतो. याचाचअर्थ प्रत्येक वर्षी मकर राशीत प्रवेश सुमारे 6 तास पुढे जातो म्हणजे 4 वर्षांनी 1 दिवस अर्थात 24 तास पुढे जाणे आवश्यक आहे. परंतु इंग्रजी कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे 4 ने भाग जाणाऱ्या वर्षी म्हणजेच प्लुत अर्थात लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात व त्या वर्षाचे दिवस 366 होतात.या 29 फेब्रुवारी मुळेच संक्रात अनेक वर्षे एका तारखेला येते. परंतु ज्या शतक वर्षांना 4 ने भाग जातो, पण 400 ने भाग जात नाही,त्या वर्षी फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो. त्यामुळे त्या शतक वर्षापासून संक्रांत एक तारीख पुढे जाते.मात्र 6 तास ,9 मिनिटे,10 सेकंदांनी संक्रमण वेळ जास्तीची असल्याने तो काळ साठत जाऊन 157 वर्षांनी मकर संक्रात एक दिवसाने पुढे जाते. पण हा बदल एकदम होत नाही तो टप्प्याटप्प्याने होतो.
पहिल्या टप्प्यात दर चार वर्षांनी 1 दिवस,दुसऱ्या टप्प्यात 3 वर्षांनी 1 दिवस,तिसऱ्या टप्प्यात 2 वर्षांनी एक दिवस आणि चौथ्या टप्प्यात एकच तारीख काही वर्ष राहते. सन 200 मध्ये निरयन मकर संक्राती 22 डिसेंबरला येत होती. सन 1899 मध्ये निरयन मकर संक्राती 13 जानेवारीला आली होती. सण 1972 पर्यंत मकर संक्राती 14 जानेवारीला येत होती.1972 पासून सन 2085 पर्यंत निरयन मकर संक्रात कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला असणार आहे. इसवी सन 2085 नंतर दर वर्षी ही मकर संक्रात 15 जानेवारीला असेल. त्यानंतर सन 2100 ला 400 ने भाग जात नसल्याने सन 2100 पासून निरयन मकर संक्राती 16 जानेवारीला येईल. अशा रीतीने पुढे सरकत सरकत सन 3246 मध्ये मकर संक्राती एक फेब्रुवारीला येणार आहे.असं गणित दाते पंचांग कर्ते मोहनराव दाते यांनी त्यांच्या कालसुसंगत आचारधर्म या ग्रंथात उल्लेख केलेला आहे .
म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत इंग्रजी तारखे ऐवजी तिथीनुसार भौगोलिक परिस्थिती वातावरणातील होणारे बदल, त्या ऋतूत पिकले जाणारे धनधान्य, फळे, पालेभाज्या त्याचा मानवाच्या शरीरावर होणारा शुभ परिणाम याचा विचार करून आपल्या सणांची संस्कृती दिसते. यावरून पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन किती खोल होता हे समजते.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)
![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
Recent Posts
पोलीस प्रवाह न्युज करमाळा, दि. ९- तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त करमाळा शहरामध्ये प्रथमच दि. ६ मार्च ते ८ मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्य... Read more






































