पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- शैक्षणिक वर्ष २०२५- २६ ची सुरुवात सोमवार दि १६ जून रोजी माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खांदाड मध्ये मोठ्या उत्साहाने व आनंददायी वातावरणामध्ये झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव तहसीलदार दशरथ काळे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत शाळा प्रवेशोत्सव २०२५- २६ च्या आदेशानुसार शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा पावसाच्या साथीने व लेझीम, ढोल वाजवत साजरा करण्यात आला. पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रांगणात आल्यावर औक्षण करून कोऱ्या पानावर मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. तसेच या वेळी खांदाड गाव अध्यक्ष काशीराम पवार, उपाध्यक्ष अनंत पवार शाळा कमिटीचे अध्यक्ष महेश पवार, उपाध्यक्ष तेजस्वी घर्वे, केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे, गावचे पोलीस पाटील नथुराम पवार, खजिनदार रामदास पवार, संतोष मांजरे, सचिन मांजरे, दत्ताराम पवार, संजय मालोर, संजय माने, स्वीकृत नगरसेवक मनोज पवार, मारुती मालोरे, पारखे, संतोष मोरे, राशिद कासार, समीर गुगले, सुहास शिंदे, विठोबा पालकर, राहुल दसवते, राजेंद्र पवार, अंगणवाडी सेविका भोनकर मदतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते फित कापून प्रवेशोत्सव सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी वाले व सहाशिक्षिका मधुरा वेदपाठक यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांचे पहिले पाऊल कुंकवाच्या साहाय्याने संस्मरणीय करण्यात आले. मुलांना पेन्सिल, वही, अंकलिपी, व खाऊ इत्यादी साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विध्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार काळे यांनी बोलताना सांगितले की, सध्या पालकांचे इंग्रजी माध्यमांकडे जास्त कल असून विद्यार्थ्यांची मराठी शाळांकडे पाठ फिरताना दिसत आहे. याला कारणीभूत आपण पालक आहोत. यावर्षी सीबीएससी पॅटर्न प्रमाणे इयत्ता पहिली सुरू होत आहे. पुढच्या वर्षी दुसरी सुरू होईल असे आता मराठी शाळा देखील इंग्रजी माध्यमांप्रमाणे होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच शिक्षण चांगले मिळेल ही जबाबदारी शाळेतील शिक्षकांच्या असून गुणवत्तापूर्ण शिक्षण कसा देता येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत.
माणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी आपल्या मनोगतात खांदाड शाळेच्या राज्यस्तरावरील सादरीकरणाबद्दल कौतुक करून शाळेला शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी उपस्थितांचे आभार मानून प्रवेशोत्सव २०२५ -२६ कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.




































