पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव – दि. ६- शहरातील वाहतुकीने गजबलेल्या मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालया समोर झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पो ट्रॅव्हलरच्या वाहनचालकाने पोलिसांच्या उभ्या असलेल्या वाहनाला धडक देऊन रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यांना सुमारे २० फूट फरफटत नेले. बेदरकारपणे चालवणारा वाहनचालक फुटपाथवर गाडी चढवून तात्काळ फरार झाला.
माणगाव शहरातील वाहतुक कोंडीची समस्या कायम असून एक महिन्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात माणगाव शहरातील जुने माणगाव येथील तरुण रफिक जामदार याचा देखील भीषण अपघातात करूण अंत झाला होता. या भीषण अपघातामुळे माणगाव शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत शासनाचा निषेध करीत आहेत. या अपघातग्रस्तांना जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना खांदाड येथील वामन पवार यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून खांदाड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे ग्रामस्थ व नागरिकांना चालणे देखील अवघड होऊन बसले आहे. ही वाहतुकीची समस्या ताबडतोब सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दि. ६ मे रोजी ४ वा. च्या सुमारास म्हसळा येथून माणगांवकडे येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर क्र. एम एच ०६ बी डब्लू ९८६७ वरील वाहन चालक वाऱ्याच्या वेगाने सुसाटपणे येताना नागरिक पाहत होते. त्यानंतर काही क्षणातच मोर्बा रोड जवळील रिक्षा बस स्थानक आणि उपजिल्हा रुग्णालया समोरील मार्गाच्या एका बाजूने रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले खांदाड येथील वामन पवार व मौजे पाचोळे येथील दिनेश शेलार, दिपीका शेलार यांना जोरदार भीषण धडक दिली. या धडकेने वामन पवार व दिपीका शेलार रस्त्याच्या बाजूला उडाले गेले. तर दिनेश शेलार यांना २० फूट फरफटत नेत फुटपाथवर चढताना सुकी मच्छि व्यवसाय करणाऱ्या दुकानाला या वाहनाने धडक दिली. नागरिक व पोलिसांनी तत्परता दाखवून तात्काळ अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघात नंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती कळताच माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
गेली ५ दिवस माणगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. सलग चार दिवस सुट्ट्या आणि दि. ५ व ६ मे रोजी एस टी कामगार संघटनेचे अधिवेशन असल्याने वाहतुकीची समस्या आणखीच बिकट झाली होती. तासनतास गाड्या थांबत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. या अपघाताने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या अपघाताचा तपास माणगांव पोलीस करीत आहेत.



































