पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४- येत्या ७ फेब्रुवारीला होणाऱ्या रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दादांच्या चरणी विजय समर्पित करायचा असेल तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळाशेत गटातील उमेदवार दिशा दिपक जाधव व पंचायत समिती गणातील उमेदवार मनीषा संदेश मालोरे तसेच साई पंचायत समिती उमेदवार संगीता बक्कम या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे भावनिक आवाहन खा.सुनील तटकरे यांनी तळाशेत गटातील जनतेला केले.
रायगड जिल्हा परिषद व पंच्यात समिती निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचाराची अंतिम टप्प्यातील रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. माणगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दिशा दिपक जाधव व पंचायत समिती गणातील उमेदवार मनीषा संदेश मालोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. या सभेत खा.सुनील तटकरे यांनी उपस्थितांना भावनिक मार्गदर्शन केले. या सभेला पक्षाचे जेष्ठ नेते शेखरशेठ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष काका नवगणे, पक्षाचे प्रदेश युवक सचिव दिपक जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे, जिल्हा उपाध्यक्ष उदय अधिकारी, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष रिया उभारे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, नगरसेविका लक्ष्मी हिलम, माजी नगरसेवक जयंत बोडेरे, महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा श्रद्धा यादव, उमेदवार दिशा जाधव, उमेदवार मनीषा मालोरे, सुमित काळे, नितीन वाढवळ, संगीता चव्हाण, बाळा खातू, मेघनाथ सातपुते, शुक्रदास मोरे, मनोज जैन, शामराव येलकर, समीर मेहता, ऋषिकेश जैन, मिलिंद खानविलकर, सतीश पवार, महेश महाजन, संतोष यादव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.तटकरे यांनी अजितदादांना आदरांजली अर्पण करीत पुढे बोलताना सांगितले कि, दादांच्या समवेत वाटचाल करीत असताना विकासाची वाटचाल तर केलीच परंतु विचाराची देवाण – घेवाण देखील केली. महाराष्ट्राच्या जडण घडणीत दादांचे मोठे योगदान असून हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. आदितीला त्यांनी मुली प्रमाणे प्रेम दिले. त्यांची आठवण कायम स्मरणार्थ राहील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जनक म्हणून दादांकडे पहिले जात होते. दादा आज हयात नसल्याने लाडक्या बहिणी पोरक्या झाल्या आहेत. जनतेने उत्तम पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडणून देणे आवश्यक आहे. असे सांगत त्यांनी दिपक जाधव यांचे कौतुक करताना सांगितले दिपकशेठ तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे झाला आहात. त्यामुळे विरोधक काय बोलतायत त्याकडे लक्ष देऊ नका. अहंकार हा जास्त काळ टिकत नसतो. जनताच विरोधकांचा अहंकार मोडून काढेल. ४० वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात आपण सर्वानी मला भरपूर पाठबळ दिले. या विभागातील एकही गाव, वाडी, वस्ती अशी नसेल ज्याठिकाणी आपले विकास काम नाही. विकासाच्या जोरावर आपले दोन्ही उमेदवार निवडून येतील असे सांगत रायगड जिल्हा परिषदेवर आपल्या विचाराची सत्ता येऊन माणगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. तालुकाध्यक्ष काका नवगणे यांनी व प्रदेश युवक सचिव दिपक जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून या विभागात झालेल्या प्रचंड विकास कामांमुळे आपले दोन्ही उमेदवार मोठया फरकाने असा विश्वास व्यक्त केला. या सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



































